पत्रावरून डॉक्‍टरांतच जुंपली

“एमसीआय’चे ते पत्र बेकायदेशीर : डॉ. आशुतोष गुप्ता


“एमसीआय’चे पत्र वैद्यकीय क्षेत्रात विषमता निर्माण करणारे

पुणे – अन्य पॅथीच्या डॉक्‍टरांसोबत काम करण्याला मज्जाव करणारे “महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने (एमसीआय) त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या डॉक्‍टरांना काढलेले पत्र बेकायदेशीर असल्याचा आक्षेप “महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ (एमसीआयएम) चे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी घेतला आहे. ही सूचना रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना लिहिले आहे.

“हे पत्र बेकायदेशीर असून, महाराष्ट्रातील अन्य डॉक्‍टरांना मिळालेल्या कायदेशीर अधिकारावर घाला घालणारे आहे. “एमसीआय’ने 15 डिसेंबर रोजी हे पत्र काढले आहे. या पत्रामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेवर दूरगामी नकारात्मक परिणाम होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्व पॅथींचे डॉक्‍टर परस्पर समन्वयाने काम करत असताना त्यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचे काम या पत्रामुळे होणार आहे. सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर देखील या अमानवीय सूचना पत्रकाचा विपरित परिणाम होईल,’ असे डॉ. गुप्ता यांचे म्हणणे आहे.

“एमसीआय’ चे पत्र वैद्यकीय क्षेत्रात विषमतापूर्ण “स्पृश्‍यास्पृश्‍यता’ निर्माण करणारे आहे. कायद्यातील तरतुदींना हरताळ फासणारे आहे. राज्य सरकारद्वारे विधीस्थापित स्वायत्त परिषदेने देणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हे पत्र बेकायदेशीर असून ते रद्द करावे, अशी मागणी गुप्ता यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्राद्वारे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.