11 हजार केशरी आंब्याची आरास
सोलापूर, (प्रतिनिधी) – सध्या आंब्याचे दिवस बहरले असतानाच भक्तांकडून देवालाही आंब्यांचा नैवेद्य आवडीने दाखवला जात आहे. लोकदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात केशरी आंब्याची आरास करण्यात आली. त्यामुळे विठोबा रखुमाईचे मंदिर आमराईसारखे बहरल्याचे दिसून आले. विनायक कांची या पुण्यातील विठ्ठल भक्तांनी हे आंबे देवास अर्पण केले. या आंब्यामुळे भक्तीच्या सुगंधात आंब्याचा दरवळ मिसळला असून, येणाऱ्या भाविकांचे मन अधिकच प्रफुल्लित होत आहे.
अक्षय तृतीयेपासून आंब्याचा हंगाम सुरू होतो असे मानले जाते. सध्या राज्यात सर्वत्र आंब्याची बाजारपेठ फुलली आहे. बाजारात ग्राहकांची आंब्याला मोठी मागणीही वाढली आहे. लोकांच्या याच आंबे प्रेमाचे प्रतिबिंब लोकदेवता विठ्ठलाच्या मंदिरातही उमटले आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त आंब्याचे व्यापारी विनायक कांची यांनी तब्बल 11 हजार अस्सल हापूस आंबे विठ्ठलास अर्पण केले. सध्या बाजारात हापूस आंब्याचा असणारा दर लक्षात घेता सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे हे आंबे आहेत. या सर्व आंब्याची आरास
मंदिर, गाभाऱ्यात करण्यात आली. आंब्यासोबत आंब्याचे हिरवे डहाळे बांधल्यामुळे त्यातचे गाभार्यात मधुर आंब्याचा दरवळ पसरल्याने आमराईत आल्याचा भास भाविकांना होतो आहे. सकाळपासूनच दर्शनास आलेल्या भाविकांकडून या अभिनव आरासीचे कौतुक होत आहे. या आंब्याचा रस करून देवस्थानच्या अन्नछत्रात भाविकांना दोन, ते तीन दिवस पुरवला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.