वेलिंग्टन – सीरियातून तुर्कीत प्रवेश करताना इस्लामिक स्टेटशी संबंधीत एका महिलेला आणि तिच्या दोन मुलांना तुर्कीत अटक करण्यात आली आहे. या महिलेकडे न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीं देशांचे नागरीकत्व आहे. पण आता या महिलेचा स्वीकार कोणी करायचा यावरून ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला आहे.
दोन्ही राष्ट्रांनी ही जबाबदारी एकमेकांवर ढकलली आहे. या विषयावरून दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाली पण त्यात त्यांच्यातील मतभेद कमी होण्याऐवजी अधिकच उफाळून आले आहेत.
ही महिला केवळ तिच्या वयाच्या सहाव्या वर्षीपर्यंत न्युझिलंडमध्ये होती. पण त्यानंतर ती कायमच ऑस्ट्रेलियात राहायला गेली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियानेच तिचा स्वीकार केला पाहिजे असे न्युझिलंडचे म्हणणे आहे. पण ऑस्ट्रेलियाने तिला स्वीकारयला नकार दिला असून तिच्याकडे न्युझिलंडचा ही पासपोर्ट असल्याने त्या देशानेच तिची जबाबदारी घेऊन तिचा स्वीकार करायला हवा असे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे.
आमच्या देशाने सन 2015 मध्ये जो कायदा केला आहे त्यात दहशतवादाशी संबंधीत नागरीकाचे नागरीकत्व आपोआप रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे तिचे ऑस्ट्रेलियातील नागरीकत्व आपोआप रद्द समजण्यात यावे अशी भूमिका ऑस्ट्रेलियाने घेतली आहे.
ही महिला तिच्या दोन मुलांसह सीरियातून तुर्कीत आली आहे. तथापि तिला ताबडतोब आपल्या देशातून तिच्या मुळ देशात घालवून दिले जाईल असे तुर्कीने म्हटले आहे. तिच्या कडे न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीं देशांचे नागरीकत्व असल्याने तिला नेमके कोठे पाठवायचे असा प्रश्न तुर्कीला पडला आहे.
आमचा देश म्हणजे सीरियात इस्लामिक स्टेटसाठी लढण्यास गेलेल्या विदेशी नागरीकांचे हॉटेल नव्हे आम्ही अशा कोणत्याहीं विदेशी नागरीकाला आमच्या देशात राहु देणार नाही असे तुर्कीने म्हटले आहे. त्यामुळे या महिलेचा प्रश्न आता खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय प्रश्न बनला आहे.