तळेगाव ढमढेरे : येथील प्रतिमा विजय कुंभार यांनी जगातील अत्यंत खडतर समजल्या जाणार्या एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेत यश मिळवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या 24व्या वर्षी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करत त्यांनी युवकांसमोर साहस, जिद्द आणि चिकाटीचा आदर्श निर्माण केला आहे. बी.टेक शिक्षण पूर्ण करून सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिमा यांना लहानपणापासूनच ट्रेकिंगची विशेष आवड होती. त्यांचे वडील विजय कुंभार यांच्या प्रेरणेतून त्यांनी अनेक गड-किल्ले सर केले. विजय कुंभार हे स्वतःही गड-किल्ल्यांच्या संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेत सक्रिय असून, त्यांनी वयाच्या 52व्या वर्षी लेह-लडाख बुलेट राईड यशस्वीरित्या पूर्ण केली होती. त्यामुळे साहसाचा वारसा प्रतिमा यांना घरातूनच मिळाला. शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठान, गिरीप्रेमी समूह तसेच एस.एल. एडव्हेंचर या ट्रेकिंग ग्रुपसोबत प्रतिमा दरमहा विविध ट्रेकमध्ये सहभागी होत असतात. तामिळनाडू येथील व्हॅली ऑफ डेथ – कोली हिल्स येथे त्यांनी बाईक राईड ट्रेकचाही थरार अनुभवला आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी प्रतिमा यांनी विशेष मेहनत घेतली. नियमित योगा, सूर्यनमस्कार, धावणे तसेच सह्याद्रीतील सराव ट्रेकद्वारे त्यांनी स्वतःची शारीरिक आणि मानसिक तयारी केली. कात्रज-सिंहगड नाईट ट्रेक, सिंहगड-राजगड-तोरणा सलग दोन दिवसांचा ट्रेक तसेच हरिश्चंद्रगड नाईट ट्रेक अशा कठीण मोहिमा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 1 मे ते 16 मे दरम्यान पार पडलेल्या या मोहिमेची सुरुवात काठमांडू येथून झाली. लुकला, नामचे बाजार, डेंगबोचे आणि लोगोचे मार्गे त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला. बर्फाच्छादित पर्वतरांगा, कमी ऑक्सिजन आणि कठीण हवामानाचा सामना करत त्यांनी यशस्वीरित्या बेस कॅम्प गाठला. या यशाबद्दल स्वातंत्र्य सैनिक आर. बी. गुजर प्रशाला तसेच विविध सामाजिक संस्थांकडून प्रतिमा यांचा सत्कार करण्यात आला. नामदेवदादा प्रतिष्ठान, तांबवे (ता. वाळवा, जि. सांगली) यांच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले असून शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठानच्या 101व्या ट्रेक मोहिमेतही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम ही माझ्यासाठी आयुष्य बदलणारा अनुभव ठरली. उणे तापमान, कमी ऑक्सिजन आणि अवघड चढाई यामुळे प्रत्येक दिवस नवे आव्हान घेऊन येत होता. काही ठिकाणी शरीर थकून जात होते, पण मनाने हार मानली नाही. वडिलांची प्रेरणा आणि कुटुंबाचा पाठिंबा सतत सोबत होता. बेस कॅम्पवर पोहोचल्यावर डोळ्यात नकळत आनंदाश्रू आले. तो क्षण शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. आता भविष्यात आणखी मोठ्या साहसी मोहिमा पूर्ण करण्याचे स्वप्न आहे. – प्रतिमा विजय कुंभार हेही वाचा : Pune District : शिक्रापुरात नदीकाठी नवजात बालक आढळले