सरकारी बॅंकांच्या कामकाजाची आजपासून एकच वेळ

ग्राहकांना सुविधा होणार; बॅंकांदरम्यान समन्वय वाढणार

पुणे – महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबरपासून सरकारी बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा समान करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना सुविधा व्हावी याकरिता असे करण्यात आले आहे.

या अगोदर बॅंकांची संघटना असलेल्या “आयबीए’ने या विषयावर बॅंकांदरम्यान चर्चा घडवून आणली होती. त्यानुसार आता रहिवासी भागातील शाखांसाठी वेळा सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 पर्यंत आहे.

दुसरा कालखंड व्यावसायिक आणि व्यापारी भागातील शाखांसाठी असून यासाठीच्या वेळा सकाळी 11.00 ते सायंकाळी 06.00 पर्यंत असतील तर, कार्यालये असणारे किंवा इतर भागातील शाखांसाठी तिसरा कालखंड सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत असेल. यावेळा 1 नोव्हेंबर 2019 पासून राज्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शाखांसाठी कामकाजाकरिता लागू होणार आहे.

महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने “आयबीए’चा आदेश आणि अग्रणी जिल्हा बॅंक व्यवस्थापकांनी तसेच जिल्हास्तरीय समन्वयन समिती यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सार्वजनिक बॅंकांच्या शाखांसाठी या वेळा मंजूर केल्या आहेत.

या बदलासाठी देशातील राज्यस्तरीय बॅंकिंग समित्यांनी हा विषय अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांकडे मांडावा आणि चर्चेपश्‍चात कामकाजाच्या समान वेळांसाठी सूचना मागवाव्यात असे “आयबीए’द्वारे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व अग्रणी जिल्हा बॅंक व्यवस्थापकांनी या वेळा चर्चा करून सूचविल्या होत्या.

अग्रणी जिल्हा बॅंक व्यवस्थापकांनी जिल्हानिहाय, बॅंकनिहाय दिलेला तपशील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर इच्छुकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध आहे. भारत सरकारच्या ईज (इएएसई) 2.0 अन्वये बॅंकिंगमधील सुधारणांच्या अंतर्गत भारतीय बॅंक्‍स संघटना (इंडियन बॅंक्‍स असोसिएशन- आयबीए) यांनी ग्राहकांसाठी सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजाच्या आता एकसमान वेळा केलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.