पुणे – निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे शहरात पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. मात्र, दोन दिवसांत पुन्हा आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने तापमानात चढ-उतार होऊ शकतात, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
शहर आणि परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गारवा चांगलाच वाढला होता. रात्रीचे किमान तापमान 14 ते 15 अंशांपर्यंत खाली आले आहे. रविवारी सुद्धा पुणे शहरात किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “पवन’ या चक्रीवादळाचा प्रभाव अद्यापही कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांत आहे. मुंबईजवळच्या चक्रीवाताची स्थिती निवळत असून, ढगाळ वातावरणाची तीव्रता कमी होत आहे. सोमवारपासून (दि. 9) पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी नागपूर येथे सर्वांत कमी 11.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आकाशाची स्थिती सध्या निरभ्र असल्याने रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा जाणवतो आहे. 11 डिसेंबरपासून पुन्हा आकाश निरभ्र होणार आहे. परिणामी त्यानंतर किमान तापमान 14 अंशांपर्यंत खाली जाऊन थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे.