नवी दिल्ली – देशात 1 जे 7 जुलै या अवधीत विजेचा वापर गेल्यावर्षी याच अवधीतील वापराच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे देशातील इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पूर्व पदावर येऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या वर्षी 1 ते 7 जुलै या अवधीत 25.72 अब्ज युनिट विजेचा वापर झाला होता. यावर्षी याच अवधीत 30.33 अब्ज युनिट इतका विजेचा वापर झाला आहे. देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊनमधून मोठ्या प्रमाणात सूट दिली असून, लोकांचे व्यवहार आता नियमितपणे सुरू होऊ लागले आहेत.
त्यामुळे हा वापर वाढला असल्याचे मानले जात आहे. करोनापूर्व काळात ज्या प्रमाणात विजेचा वापर होत होता, त्या पातळीपर्यंत आता विजेचा पुन्हा वापर होऊ लागला आहे.
अर्थकारणाला सध्या चालना मिळाली असल्याने वीज वापर वाढला असा जरी अंदाज वर्तवण्यात येत असला तरी देशात काही ठिकाणी मान्सूनच्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळेही काही प्रमाणात विजेचा वापर वाढला असावा, अशी शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.