पुणे -हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सशिवाय 60 वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा “बुस्टर’डोस दिला जाणार आहे. मात्र “कोमॉर्बिड’ असलेल्याच ज्येष्ठ नागरिकांना “बुस्टर’चा डोस मिळणार असून, तसे प्रमाणपत्र त्यांनी डॉक्टरांकडून आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
येत्या तीन तारखेपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे तर 10 जानेवारीपासून 60 वर्षांवरील नागरिकांना “बुस्टर’ डोस दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही सरसकट डोस दिला जाणार नसून, त्यांच्यातील केवल कोमॉर्बिड असलेल्या नागरिकांनाच तिसरा डोस दिला जाणार आहे.
हे डोस देण्याची प्रक्रिया अगोदरप्रमाणेच असणार आहे. आधार क्रमांकाच्या आधारेच ही नोंदणी होणार आहे. साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पात्र व्यक्तीने दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवड्यांचा कालावधी उलटला असेल तरच ते तिसऱ्या “बुस्टर’ डोस साठी पात्र असणार आहेत, अशी माहिती “राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी दिली.
“बुस्टर’ कोविन ऍपवर नोंदणी करताना “कोमॉर्बिडीटी’ विषयीचा कॉलम भरावा लागणार आहे. त्यानंतर लस घेण्यासाठी केंद्रावर गेल्यानंतर तेथील नियुक्त अधिकाऱ्यांना ते व्याधीचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच “बुस्टर’चा डोस दिला जाणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.