मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) 13,600 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ निहाल दीपक मोदी याला अमेरिकेत अटक झाली आहे. भारताच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रत्यार्पण विनंतीनंतर 4 जुलै 2025 रोजी अमेरिकन अधिकाऱ्यांनी होनोलुलु येथून 46 वर्षीय निहालला ताब्यात घेतलं.
मनी लाँडरिंग (PMLA, 2002, कलम 3) आणि गुन्हेगारी कट रचणे (IPC, कलम 120-B, 201) अशा गंभीर आरोपांखाली निहाल सध्या कोठडीत आहे, आणि त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अटकेने भारताच्या आर्थिक घोटाळ्यांविरुद्धच्या कारवाईला बळ मिळालं आहे.
पीएनबी घोटाळ्यात निहालची भूमिका
2018 मध्ये उघडकीस आलेल्या पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी बँक कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoUs) द्वारे 13,600 कोटींचा गैरव्यवहार केला. निहालने नीरवच्या दोन बनावट कंपन्यांचं व्यवस्थापन केलं, ज्याद्वारे 50 दशलक्ष शेल कंपन्यांमार्फत हस्तांतरित झाले. घोटाळा उघड झाल्यानंतर त्याने दुबईतून 50 किलो सोने, 3.5 दशलक्ष रोख रक्कम बाहेर काढली.
निहालने दुबई आणि कैरो येथील डमी कंपन्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि सर्व्हर नष्ट केले. तसेच, डमी संचालकांना स्वतःचं नाव लपवण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला. निहालने नीरवला जाणीवपूर्वक सहाय्य करत UAE, हाँगकाँग, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, अमेरिका आणि बार्बाडोस येथील शेल कंपन्यांद्वारे अवैध निधी हस्तांतरित केले. ईडीच्या आरोपपत्रानुसार, त्याने मिहिर आर. भन्साळी याच्यासोबत समन्वय साधून परदेशी मालमत्ता सुरक्षित केल्या आणि तपास यंत्रणांची दिशाभूल केली.
निहाल मोदी कोण आहे?
निहाल दीपक मोदी याचा जन्म बेल्जियममधील अँटवर्प येथे झाला असून, तो बेल्जियन नागरिक आहे. त्याला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषांचं चांगलं ज्ञान आहे. निहाल लक्झरी हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायात सक्रिय आहे. त्याने नीरवच्या फायरस्टार इंटरनॅशनल आणि अमेरिकेतील ए. जाफे ज्वेलरी कंपनीत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. 2020 मध्ये न्यूयॉर्कमधील LLD डायमंड्स USA कडून $2.6 दशलक्ष किमतीच्या हिऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप निहालवर झाला. हे प्रकरण अजूनही सुरू असून, यामुळे प्रत्यार्पण प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.
अशी केली अटक?
२०१९ मध्ये इंटरपोलने निहाल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा शोध जागतिक स्तरावर सुरू झाला. २०२१ मध्ये सीबीआय आणि ईडीने अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. तो अमेरिकेत असल्याची माहिती भारताकडे होती. अलीकडेच, भारताच्या विनंतीवरूनच अमेरिकन अधिकाऱ्यांनी निहालला अटक केली आहे. त्याला होनोलुलु येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
पीएनबी घोटाळा हा भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांपैकी एक आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात असून, त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. मेहुल चोक्सी बेल्जियममध्ये ताब्यात आहे. निहालच्या अटकेमुळे शेल कंपन्यांचे जाळे आणि अवैध निधी हस्तांतरणाचा तपास पुढे जाण्याची शक्यता आहे. भारतीय यंत्रणांना या अटकेमुळे घोटाळ्याच्या गुंतागुंतीच्या कटाचा उलगडा होण्याची आशा आहे.