कॉंग्रेससाठी “गुड न्यूज’ : राष्ट्रवादीच्या तयारीवर पाणी फेरण्याची भीती
पुणे – आघाडीच्या जागावाटपात अनपेक्षितपणे इंदापूरऐवजी जुन्नरची जागा कॉंग्रेसला सोडण्यात येणार असल्याचे ठरल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ज्या-ज्यावेळी तालुक्यात कोणत्याही निवडणुका झाल्या त्यावेळी शेरकर कुटुंबीयांनी राष्ट्रवादीला प्रामाणिकपणे साथ दिली.
राष्ट्रवादीच्या विजयात त्यांचा वाटा तोलामोलाचा राहिला आहे. तीच मदत बेनके कुटुंबीयांनी देखील कॉंग्रेसच्या अथवा शेरकर यांच्याशी संबंधित सर्व निवडणुकांत केली आहे. स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांना खासदार करण्यात बेनके कुटुंबाचा जसा वाटा राहिला तसाच वाटा वल्लभ बेनके यांना आमदार करण्यात शेरकर कुटुंबाचा राहिला आहे. नेहमीच आघाडी धर्म पाळणाऱ्या शेरकर कुटुंबीयांना आता उमेदवारी मिळाल्यास तोच धर्म राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निष्ठेने पाळावा अशी अपेक्षा असणार आहे.
सत्यशील शेकर व अतुल बेनके यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कोणताही कार्यक्रम असला तरी दोघे व्यासपिठावर असताना एकमेकाचे कौतुक करता असतात. हीच दोस्ती विधानसभेच्या जागावाटपामुळे तुटू नये ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे झाल्यास जुन्नरची जागा आघाडीच जिंकेल यात दुमत नाही. सध्याचा विचार करता या मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद असली तरी पारंपरिक हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा राहिला आहे. ज्येष्ठ नेते वल्लभ बेनके यांच्यानंतर अतुल बेनके यांनाही मोठा जनाधार आहे. याच जनाधाराच्या जोरावर सत्तेत नसतानाही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यात बेनके कुटुंबीय अग्रेसर असते. जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, विधानपरिषदेचे आमदार असो वा राज्यसभेचे खासदार आदी सर्वांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेनके यांनी विकासकामे केलेली आहेत. प्रसंगी स्वनिधीही अनेक कामांसाठी वापराला आहे.
अतुल बेनके यांच्या नावास सर्वानुमते संमती
जुन्नर मतदारसंघातून अतुल बेनके यांच्या नावास राष्ट्रवादीतून सर्वानुमते संमती आहे. तसा ठरावच येथील नेत्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे काही दिवसांपूर्वी पाठविला आहे. मागीलवेळी नाराज असलेले संजय काळे यांनी पूर्ण क्षमतेने अतुल बेनके यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. यापूर्वी असलेली थोडीफार गटबाजीही शमविण्यात अतुल बेनके यांना यश आल्याने ही जागा यावेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केला आहे. प्राथमिक चर्चेत जागा कॉंग्रेसला सोडायचे ठरले असले तरी पवारसाहेब ही जागा आपल्यासाठीच सोडतील अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे.
सत्यशील शेरकरांच्या पाठीशी युवा फळी
स्व. निवृत्तीशेठ शेरकर, सोपानशेठ शेरकर यांच्यानंतर अगदी कमी वयात सत्यशील शेरकर यांनी कारखान्याची धुरा योग्यरीत्या सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याने विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली. याबरोबरच तालुक्यात मरणासन्न अवस्थेत असलेल्या कॉंग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून “जान’ आणली. तरुणांशी जुळवून घेत मोठी युवा फळी तयार केली. स्थानिकांसह वरिष्ठ नेत्यांशीही सत्यशील यांची जवळीक आहे. यांसह इतर पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध असल्याने त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे. याच लोकप्रियतेचा फायदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत होऊ शकतो.
विधानसभेसाठी माझी संपूर्ण तयारी झाली आहे. जागा कोणाला सोडायची, याचा सर्वस्वी निर्णय आघाडीचे नेते घेतील. शरद पवार हे माझे नेते आहेत. ते जो निर्णय देतील तो मला मान्य राहिल. राष्ट्रवादीला जागा नाही मिळाली तरी आम्ही वेगळा निर्णय घेणार नाही, यापूर्वी बेनकेसाहेबही असे कधी वागले नाहीत. त्यामुळे तालुक्यात आघाडी धर्माला तडा जाऊ न देता आघाडीच्याच उमेदवाराला आम्ही विजयी करू. उद्या कदाचित सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळालीच तर मी त्यांचा प्रचारप्रमुख असेल.
– अतुल बेनके, इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस
आजपर्यंत आम्ही आघाडी धर्माचे पालन केलेले आहे. लोकसभा निवडणुकीतही खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात कॉंग्रेसचा मोठा वाटा राहिला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यातच जुन्नरची जागा पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अतुल बेनके आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मला उमेदवारी मिळाल्यास ते आघाडीचा धर्म निश्चितपणे पाळतील, अशी अशा आहे.
– सत्यशील शेरकर, इच्छुक उमेदवार कॉंग्रेस