पिंपरी – डंपर आणि दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मृत्यूच्या दाढेत सोडून त्याच्या मित्रानेच पलायन केले. उपचारादरम्यान तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्या तरुणाचा मृत्यू झाला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना एमआयडीसी भोसरी येथे सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.
समीरकुमार धडीराम सीथा (वय 33, रा. कैलासनगर, पिंपरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. एमएच-14-सीएफ-1520 या डंपरीवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर आणि त्याचा मित्र दुचाकीवरून चालले होते. समीरचा मित्र दुचाकी चालवत होता. एमआयडीसी भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामाजवळ समीरच्या मित्राने महापालिकेच्या कचऱ्याच्या डंपरला ओव्हरटेक करीत असताना त्या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. त्यावेळी समीरला डंपरचा धक्का लागल्याने तो रस्त्यावरून घसरत जाऊन जखमी झाला. त्याच्या मित्रालाही किरकोळ मार लागला. जखमी समीर हा मदतीसाठी मित्राकडे पाहत होता. मात्र समीर जास्त जखमी झाल्याने मित्र समीरला घटनास्थळी सोडून दुचाकी घेऊन पळून गेला. जवळच असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी मनोज आलापुरे यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी समीर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान समीरचा मृत्यू झाला. मित्रासाठी काहीजण जीवही देतात, प्रसंगी एखाद्याचा जीवही घेतात, हे आजवर आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र सोमवारच्या या घटनेनंतर आमचा मैत्रीवरील विश्वास उडाल्याची भावना समीरच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
समीरकुमार आणि त्यांच्या गावातील मित्र यांनी चाकणमधील एका कंपनीत वेल्डिंगचे काम केले. रविवारी त्यांचे काम संपल्याने सोमवारी ते दोघेजण कंपनीतून कामाचे पैसे आणण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. समीरचे मार्च महिन्यात विवाह झाला असून त्याची पत्नी गरोदर आहे. चाकणमधील काम संपल्याने तो इतर ठिकाणी कामाच्या शोधात होता. त्याला नवीन कामही मिळाले होते. मंगळवारपासून तो नवीन कामावर जाणार होता. मार्च महिन्यात नवीन बाळ घरात येणार असल्याने सीथा परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता परिवारावर शोककळा पसरली आहे.