मैत्रिदिनी मित्रांना आरोग्यदायी शुभेच्छा देण्यासाठी मित्र धावले 52 हजार किलोमीटर

बारामती (प्रतिनिधी) : फ्रेंडशिप डे निमित्त बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित “फ्रेंडशिप डे रन” बारामती इंटरनॅशनल व्हर्चुअल मॅरेथॉन लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करीत, उदंड प्रतिसादात संपन्न झाली. या मॅरेथॉनमधील सर्वांच्या धावण्याचा सरासरी आकडा 52 हजार किलोमीटरवर पोहचला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले ते परदेशात धावणारे व्यावसायिक रनर्स.

झिम्बाब्वे, युनायटेड स्टेटस, दुबई, बांग्लादेश,मलेशिया,पाकिस्तान,सिंगापूर, नायजेरिया,लेबनान या देशांसह एकूण 27 देशातील रनर्सने या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. तसेच संपूर्ण भारतातून हजारो स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक एका विधायक हेतूने प्रेरित होऊन धावले.तर बारामती आणि परिसरातील 1000 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिकारशक्ती वाढविणे हे प्रत्येकासमोरचे मोठे आव्हान आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, आरोग्याबाबत त्यांना जागृत करणे हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सगळेजण प्रत्यक्षात एकत्र येऊ शकत नसतानाही या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत आपण भारतीय आरोग्याबाबत जागरूक आहोत हाच संदेश सर्व सहभागी स्पर्धकांनी दिला. या मॅरेथॉनमध्ये एकूण 5 हजार 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी या मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केले. आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या तसेच मार्गदर्शनही केले.मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, कार्व्हर एव्हीएशन, अक्षय शिंदे फाऊंडेशन, जोतीचंद भाईचंद सराफ, मगर ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट, वैष्णवी ग्राफिक्स, अभिषेक पब्लिसिटी, आदित्य मिडिया, बारामती सायकल क्लब या संस्थांनी विशेष सहकार्य केले. तर एन्व्हार्यमेंटल हेल्थ क्लब,वुई द फ्युचर ग्रुप,रनर्स ग्रुप या क्रीडा संस्थांनीही मॅरेथॉन दिवशी मोलाचे सहकार्य केले.

आयोजक या नात्याने आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार मानले व येणाऱ्या काळात आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारी विषयी मार्गदर्शन, आहार व व्यायाम याविषयी मोफत मार्गदर्शन तसेच क्रीडा क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविणार असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.