पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांना मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणे चांगलेच महागात पडले आहे. मागील आठवड्यात मित्राचा वाढदिवस झाला म्हणून त्याचे सेलिब्रेशन म्हणून पाच मित्र लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. तेव्हा, दोन मित्राचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या मित्रांसोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. खाणीत बुडून वाढदिवस झालेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या आकाश गुरवचा मागील आठवड्यात वाढदिवस झाला होता. त्यांचे सेलिब्रेशन करण्यासाठी आकाश त्याच्या मित्रांसह लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, आकाश आणि धिरेंद्र हे दोघे ही खाणीत पोहण्यासाठी उतरले तेव्हा, त्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तर, शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.