नगर – महापालिकेच्या निवडणुका होऊन वर्ष झाले तरी अद्याप पाच स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. आता पाच स्वीकृत नगरसेवक नियुक्तीला अखेर मुहूर्त सापडला असून नगरसेवक नियुक्तीसाठी दि. 10 जानेवारी रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपर्यंत या नियुक्त्या रोखल्या होत्या.
आता त्या मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मात्र, यामुळे मनपाचे राजकारण तापणार आहे. महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर भाजपच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद येणार आहे. पण या पाच जागांसाठी तिन्ही प्रमुख पक्षात मिळून तब्बल 25 ते 30 इच्छुक असल्याचे सांगितले जाते. यापैकी काहींनी सोशल मीडियातून स्वतःच्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची मागणी पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे कामही सुरू केले आहे. इच्छुकांची संख्या पाहता. नाराजांची संख्या वाढणार असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकांपर्यंत या नियुक्त्या न करण्याचे पक्षनेत्यांनी ठरवले होते.
त्यामुळे आतापर्यंत या नियुक्त्या झाल्या नाहीत. पण आता निवडणुका झाल्याने या नियुक्त्या करण्याचे वाकळेंनीच ठरवले आहे. त्याला आता मुर्हूत मिळला असून तब्बल वर्षभरानंतर 5 स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्ष नेता या सहा निवडी केल्या जाणार आहे. महापालिकेची निवडणूक मागील डिसेंबर 2018 मध्ये झाल्यानंतर जानेवारी 2019 मध्ये महापौर वाकळेंची निवड झाली. त्यानंतर त्यांनी लगेच फेब्रुवारीमध्ये मनपा स्थायी समिती व महिला आणि बालकल्याण समितीच्या प्रत्येकी 16 सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
त्यांचे सभापतीही निवडले जाऊन या दोन्ही समित्यांचे कामकाजही सुरू झाले आहे. स्वीकृत नगरसेवकपदाच्या 5 जागा रिक्त होत्या. यातील शिवसेनेच्या दोन जागांसाठी दिलीप सातपुते, रवी वाकळे, विक्रम राठोड, हर्षवर्धन कोतकर, दिगंबर ढवण यांच्यासह अन्य बरेचजण इच्छुक असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीच्या दोन जागांसाठी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, बाबा गाडळकर, प्रा. अरविंद शिंदे, अभिजित खोसे व अन्य काहीजण तर भाजपच्या एका जागेसाठी किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी व सुवेंद्र गांधी अशी प्रमुख मंडळी इच्छुक असल्याचे सांगितले जाते.