पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सध्या मॅक्रॉन सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. सात दिवस ते सेल्फ आयसोलेशनमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. सध्या त्याच्यामध्ये प्राथमिक लक्षणं दिसून येत असून ते आयसोलेशनमध्ये असतानाही काम सुरु ठेवणार आहेत, असे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मॅक्रॉन यांना करोनाची प्राथमिक लक्षणे सौम्य प्रमाणात दिसून आल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल हाती आल्यानंतर मॅक्रॉन यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.
फ्रान्समधील नियमांनुसार करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता मॅक्रॉन सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. या कालावधीमध्ये ते आपलं काम सुरु ठेवणार आहेत. या कालावधीमध्ये व्हिडीओ कॉलवरुन होणाऱ्या सर्व बैठकांना आणि चर्चा सत्रांनाही मॅक्रॉन उपस्थिती लावणार आहेत. मॅक्रॉन यांच्या संपर्कात आलेले देशाचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांच्या करोना चाचणीचा निकाल नकारात्मक आला आहे.