पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत स्टेनिस्लास वावरिंका याने मानांकित खेळाडू ऍण्डी मरे याचा पराभव करत आगेकूच केली आहे. त्याने या सामन्यात 6-1, 6-3, 6-2 अशा तीन सरळ सेटमध्ये मरेचे आव्हान संपुष्टात आणले.
हे दोघेही ग्रॅण्डस्लॅम विजेते खेळाडू असल्याने त्यांच्यातील खुन्नस पाहण्यासाठी कोर्टवर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी दोघांनाही प्रोत्साहन दिले. करोनाचा धोका कमी झाल्यामुळे या
स्पर्धेला ठरावीक संख्येने प्रेक्षकांना प्रवेश दिला जात आहे. हा सामना त्यांच्यातील यापूर्वी झालेल्या सामन्यांसारखाच रोमहर्षक होईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. वावरिंकाने हा सामना केवळ 97 मिनिटांत जिंकला व दुसरी फेरी गाठली.
पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात अलेक्झांडर ज्वेरेवने डेनिस नोवाक याचा 7-5, 6-2, 6-4 असा पराभव केला व दुसरी फेरी गाठली. ही स्पर्धा यंदा येथील शित वातावरणामुळेच जास्त गाजत आहे. करोनाचा धोका कमी झाल्यानंतर या स्पर्धेला प्रारंभ झाला. मात्र, येथील थंडीच्या वातावरणात खेळताना खेळाडूंना सातत्याने त्रास होत आहे.