जोकोविचला अजून एका विक्रमाची संधी

नवी दिल्ली – आजपासून सुरू होत असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचला आपल्या कारकिर्दीत आणखीन एक विक्रम करण्याची संधी असुन एका वर्षात चार ग्रॅण्डस्लॅम पुन्हा एकदा जिंकण्याची संधी त्याच्याकडे आहे. त्याने यापूर्वी एकदा एका वर्षात चार ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला असून आता त्याची पुनरावृत्ती करून तो इतिहास घडविण्यास सज्ज झाला आहे.

टेनिस इतिहासात जोकोविचपूर्वी डॉन बुडगे (1938) आणि रॉड लावेर (1962, 1969) यांनी एकदम चार ग्रॅंडस्लॅम जिंकण्याची किमया केली आहे. जोकोविचने आतापर्यंत 15 ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. याबाबतीत फेडरर (20) आणि नदाल (17) हे दोघे त्याच्या पुढे आहेत.

मात्र, सध्या जोकोविचच्या मार्गात राफेल नदाल, रॉजर फेडररचा मोठा अडथळा आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे दोघे लयीत आहेत. त्यामुळे विजेतेपद मिळविण्यासाठी जोकोविचला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. जोकोव्हिचने यापूर्वी 2016 साली चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. 2018 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर त्याने यंदाच्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. त्यानंतर आता फ्रेंच ओपन जिंकल्यास त्याला सलग चार ग्रॅंडस्लॅम मिळवण्याचा बहुमान दुसऱ्यांदा मिळेल.

सध्या जोकोविचला सर्वात मोठे आव्हान स्पेनच्या राफेल नदालकडून आहे. नदालला लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखले जाते. त्याने आतापर्यंत विक्रमी 11 वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इटालियन ओपनचे विजेतेपद मिळवून तो चांगल्या लयीत परतला आहे.

तर, 37 वर्षांचा फेडरर 2015 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणार आहे. यंदा त्याने जर विजेतेपद मिळवले तर तो या स्पर्धेचा सर्वात वयस्कर विजेता ठरणार आहे. या स्पर्धेतून फेडरर विम्बल्डनची तयारी करण्यावर भर देणार आहे. त्याचा पहिला सामना 73 व्या स्थानावरील इटलीच्या लोरेंजो सोनेगो याच्याविरुद्ध होणार आहे. जोकोविच, नदाल, फेडरर या बिग थ्री व्यतिरिक्‍त चौथ्या स्थानावरील डॉमनिक थिएम आणि सहाव्या स्थानावरील ग्रीसचा स्टेफनोस त्सित्सिपास हे सुद्धा या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)