पॅरिस – ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील युरोपमधील मानाची समजली जाणारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा येत्या 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे फ्रान्स टेनिस संघटनेने जाहीर केले आहे.
रोलॅण्ड गॅरोसच्या लाल मातीच्या कोर्टवरील ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न जगभरातील मानांकित टेनिसपटूंचे असते. जग जिंकलेले अनेक टेनिसपटू इथे मात्र, अनेकदा अपयशी ठरताना दिसतात. या स्पर्धेवर गेल्या दशकापासून राफेल नदाल यानेच वर्चस्व राखलेले असून यंदा रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच यांच्याकडून नदालला आव्हान देणार का नदाल पुन्हा एकदा बादशहा ठरणार हेदेखील स्पष्ट होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा वारंवार लांबणीवर टाकण्यात येत होती.
फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांमध्ये करोनाचा धोका वाढल्याने या स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात आले नव्हते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाचा धोका कमी झाल्याने आयोजकांनी वेळापत्रक निश्चित केले. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानंतर जवळपास 15 दिवसांनी या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या दोन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जरी होत असल्या तरीही मानाची विम्बल्डन स्पर्धा रद्द झाली आहे तर, ऑस्ट्रेलियन स्पर्धा देखील होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.