पॅरिस –स्पेनचा अव्वल टेनिसपटू व लाल मातीवरचा बादशहा राफेल नदाल याने कारकिर्दीत 13 व्या वेळेला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जेन्नीक सिन्नर याचा 7-6, 6-4, 6-1 असा पराभव केला.
या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानला जात असलेला नदाल यंदाच्या स्पर्धेत भरात आहे. करोनाचा धोका सुरू झाल्यापासून जवळपास सहा महिन्यांनी त्याने या स्पर्धेद्वारे टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले आहे.
महिला एकेरीत अर्जेटिनाची नादिया पोडरेस्काने स्वितोलिनाला 6-2, 6-4 असे पराभूत केले. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीपासून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारी पोडोरोस्का पहिलीच महिला टेनिसपटू ठरली.
मॅचफिक्सिंगची चौकशी
या स्पर्धेतील महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामना फिक्स असल्याचे संकेत मिळाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या रोमानियाच्या आंद्रेया मितू व पॅट्रिसिया मारिया यांचा सामना रशियाच्या याना सिझिकोवा व अमेरिकेच्या मॅडिसन ब्रेंगल यांच्याशी झाला. त्यात फिक्सिंग झाल्याचे संकेत मिळाल्यामुळे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अन्य लढतीतून डॅनिल कोलिन्सने टयुनिशियाच्या ओन्स जॅबूरला 6-4, 4-6, 6-4 असे पराभूत केले. अमेरिकेच्या सोफिया केनिननेही कारकिर्दीत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने यजमान फ्रान्सच्या फियोनो फेरोला 2-6, 6-2, 6-1 असे पराभूत केले. फेरोच्या पराभवामुळे फ्रान्सचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.