पॅरिस – सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जोकोवीचने रशियाच्या करेन खाचानोव्ह याचा 6-4, 6-3, 6-3 असा पराभव केला. त्याने या स्पर्धेच्या इतिहासात 72 वा विजय मिळवत 14 वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला लाईनमनला चेंडू मारल्यामुळे जोकोवीचला त्या स्पर्धेतून बाहेर काढले गेले होते. त्यामुळे या स्पर्धेतही त्याच्या वर्तनाकडे लक्ष ठेवले जात होते. मात्र, त्याच्याकडून कोणतेही गैरवर्तन झालेले नसल्याने त्याच्या चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
अन्य लढतींत चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाने चीनच्या झॅंग शुआइ हिला 6-2, 6-4 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. क्विटोव्हाचा उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या लॉरा सेगमंड हिच्याशी सामना होणार आहे.
सेगमंडने पावला बॅडोसा हिचा 7-5, 6-2 असा पराभव केला व कारकिर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ग्रीसचा पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास याने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह याचा 6-3, 7-6, 6-2 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरी गाठलेला त्सित्सिपास ग्रीसचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.