फ्रीजमुळे रक्‍ताचे नमुने राहणार सुरक्षित

तालुका पोलीस ठाण्याचा उपक्रम इतरांसाठी अनुकरणीय
सुधीर पाटील

कराड –खून, खुनी हल्ला, सशस्त्र दरोडा, बलात्कार, यासारख्या गंभीर गुन्ह्यात तपासकामी घेण्यात येणारे रक्‍ताचे नमुने खराब होऊ नयेत आणि विलंब झाला तरी सुरक्षित राहावेत, म्हणून तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फ्रीज खरेदी केला आहे. त्यामुळे अनेक दिवस रक्‍ताचे नमुने सुरक्षित ठेवता येणे शक्‍य झाले आहे. याद्वारे तालुका पोलीस ठाण्याने आधुनिकतेच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

गंभीर गुन्ह्यावेळी घटनास्थळी सांडलेल्या रक्‍ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घ्यावे लागतात. तसेच अन्य गंभीर गुन्हे घडल्यास, बंदोबस्तावर जावे लागल्यास अगोदरच्या गुन्ह्यातील तपासकामी घेण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यास उशीर होतो. परिणामी ते खराब होण्याचा धोका संभवतो. या बाबी लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून फ्रीज खरेदी केला आहे. रक्‍ताचे नमुने फ्रीजमध्ये कितीही काळ राहिले, तरी खराब होत नाहीत. त्यामुळे रक्‍ताच्या नमुन्यांची काळजी आणि पोलिसांची जबाबदारी कमी होते.

गुन्ह्यांच्या तपासकामी रक्‍ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्याचा अहवाल खटल्यात महत्वाचा पुरावा ठरतो. तसेच बलात्कारासारख्या गुन्ह्यातील पीडितेच्याही रक्‍ताचे नमुने घ्यावे लागतात. असे नमुने सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. म्हणून तालुका पोलिसांनी स्वखर्चातून फ्रीज खरेदी करून कामकाजात गतिमानता आणि सुरक्षितता आणली आहे. पूर्वी असे नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी शहरातील खासगी मेडिकल दुकानांचा आधार पोलिसांना घ्यावा लागायचा. मेडिकल दुकानातील फ्रीजमध्ये ते नमुने काही दिवसांसाठी ठेवले जायचे. मात्र, अशा मेडिकलमधील फ्रीजमधून ते नमुने गहाळ होण्याचा धोका होता. तो धोका टाळण्यासाठी पोलीस ठाण्यातच फ्रीजची सोय करण्याचा निर्णय तालुका पोलिसांनी घेतला.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून फ्रीजची खरेदी केली. त्याचे फायदेही दिसून येऊ लागले आहेत. पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र आणि कार्यक्षेत्रातील पोलीस दूरक्षेत्रांच्या हद्दीतील वाढते गुन्हे पाहता रक्‍ताचे नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजची गरज प्राधान्याने भासू लागली. त्यावर उपाय शोधून सर्वांनी ठराविक पैसे काढून फ्रीज खरेदी केला आहे. जिल्हा पोलीस दलाने अनेक बाबतीत कात टाकून आधुनिकतेचा अंगीकार केला आहे. त्याच धर्तीवर कराड तालुका पोलीस ठाण्याने उचलले पाऊस अन्य पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. अन्य पोलीस ठाण्यांनी ही संकल्पना अंमलात आणल्यास त्यांची जबाबदारी कमी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.