‘पार्टी विथ डिफरन्स’ची लक्तरे “वेशीवर’; मुद्याचा विषय गुद्द्यावर
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता शहरवासियांनी अत्यंत विश्वासाने “पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती सोपविली. मात्र या पक्षाने आतापर्यंत केलेल्या कारभाराने शहरवासियांचा भ्रमनिरास झालेला असतानाच आज या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर पक्षाची लक्तरेच वेशीवर टांगली गेली. मार्च महिन्यातील काही आर्थिक विषयासह खासगी वाटाघाटीच्या विषयावरून स्थायीचा एक पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या निशान्यावर होता. आज स्थायीच्या ऍण्टीचेंबरमध्ये या पदाधिकाऱ्यासोबत दोन नगरसेवकांची चांगलीच “फ्री स्टाईल हाणामरी झाल्याने हा विषय पालिका वर्तुळात रंगला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 20 मार्चपासून तहकूब असलेल्या सर्वसाधारण सभा आज बोलाविण्यात आल्या होत्या. सभांचे कामकाज संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बहुतांश नगरसेवक जमले होते. तर भाजपाच्या स्थायी समितीचा माजी पदाधिकारी हा स्थायी समितीच्या ऍण्टी चेंबरमध्ये जावून बसला होता. यावेळी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आणि शिवसेनेचा एक नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य असल्याने ते ही स्थायी समितीच्या ऍण्टी चेंबरला आले होते. यावेळी मार्च महिन्यातील “हिशोबा’वरून चर्चा सुरू झाली.
मात्र, आपण हिशोब देणार नसल्याचे मोठ्या आवाजात सांगत या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला दादागिरीची भाषा केली. यावेळी दुसऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाने दादागिरीची भाषा चालणार नाही असे सांगताच या पदाधिकाऱ्याने संबंधिताची थेट कॉलर धरली. यामुळे मुद्याचा विषय थेट गुद्यावर गेला. यानंतर तिघांमध्ये थेट फ्री स्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. बाजूला उभ्या असलेल्या भाजपाच्या एका नगरसेविकेने हा प्रकार पाहून त्या ठिकाणाहून धूम ठोकली तर शेजारीच उभे असलेल्या सध्याच्या एका पदाधिकाऱ्याला अचानक घडलेला हा प्रकार पाहून घाम फुटला.
पण कोण कोणाला बोलणार यातच सुमारे पाच ते सात मिनिट फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्याला डोक्याला, छातीला आणि पोटाला मार लागला. तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या बोटाला मार लागला. यानंतर भाजपाशी निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या दोन आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मारहाण झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याला घेऊन वायसीएम रुग्णालय गाठले. या ठिकाणी करोनाचे रुग्ण असल्यामुळे या पदाधिकाऱ्याला बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
पोलिसांची घटनास्थळाला भेट….
पोलिसांना मारहाणीचा प्रकार समजताच पिंपरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिकेतील या घटनास्थळाला भेट दिली. तर अतिरिक्त पोलिसांची कुमक महापालिकेत तैनात केली. मात्र हा प्रकार पाहणाऱ्यांनी तसेच महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या ठिकाणी काहीच झाले नसल्याचे सांगत वेळ मारून नेली. रात्री उशिरापर्यंत महापालिकेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू….
या मारहाणीत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठत या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत या दोन नगरसेवकांचे जबाब नोंदविण्याचे काम पिंपरी पोलिसांत सुरू होते.
खासगी वाटाघाटीचीही किनार…
भाजपाचा मारहाण झालेला हा पदाधिकारी स्थायी समितीमध्ये वरिष्ठ पदावर असताना शहरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय गेल्या 9 महिन्यांपासून मंजूर करत नव्हता. यामध्ये आर्थिक रसद मिळावी म्हणून वारंवार हा विषय तहकूब करण्यात आला होता. नव्याने आलेल्या अध्यक्षांनी हा विषय गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मंजूर केला होता. सर्वसामान्य आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जागा विकासासाठी घेऊन त्यांना त्यांचा मोबदला देण्यात आडकाठी आणल्यामुळे हा पदाधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नगरसेवकांच्या निशान्यावर होता. त्याचाच प्रत्यय आजच्या हाणामारीत झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
अत्यंत दुर्देवी प्रकार….
महापालिकेच्या इमारतीमध्ये यापूर्वी एकमेकांवर धावून गेल्याचे अथवा शाब्दिक चकमक झाल्याचे पहावयास मिळाले होते. मात्र थेट हाणामारीपर्यंत विषय गेला नव्हता. आजची घटना महापालिकेच्या प्रथा, परंपरा आणि इतिहासालाच काळीमा फासणारी ठरल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली होती.
अगोदर उपचार – नामदेव ढाके.
महापालिकेत झालेल्या या मारहाणीनंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्याला सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके हे रुग्णालयात घेऊन गेले. यावेळी गुन्हा दाखल करणार आहात का? असे त्यांना विचारले असता आज आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यावर उपचार करत आहोत. उद्या याबाबत निर्णय घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करणार असल्याचे ढाके यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.