आर्थिक स्वावलंबनातून स्वातंत्र्याकडे… (भाग-२)

आर्थिक स्वावलंबनातून स्वातंत्र्याकडे… (भाग-१)

पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन
याबाबत अपेक्षित अशी समानता अनेक क्षेत्रात पाहायला मिळत नाही. पुरुष सहकाऱ्याच्या तुलनेत स्त्रियांना कमी वेतन दिले जाते. अगदी एकाच अग्रगण्य महाविद्यालयातून व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेले दोघे प्रेमात पडलेले असतात, एकाच कंपनीत त्यांना नोकरी लागते पण त्यांना मिळणाऱ्या वेतनात पहिल्या दिवसापासून तफावत असल्याचे दिसते.

करिअरमध्ये अनेकदा ब्रेक घ्यावा लागतो
वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांना करिअरमधून अनेकदा ब्रेक घेण्याची वेळ येते. गर्भधारणा, मुलांचा सांभाळ, अगदी घरातील आजारी आणि वृद्ध सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी यामुळे तिला ब्रेक घ्यावा लागतो. इतकेच काय नवऱ्याची बदली झाली म्हणूनही स्त्रीला तिच्या नोकरीवर पाणी सोडावे लागते. ज्याच्यावर ब्रेक घेण्याची वेळ येते तीच व्यक्ती हे सगळे किती कठीण असते ते सांगू शकते. ब्रेकनंतर पुन्हा जॉईन होणे कधीच सोपे नसते. तेवढ्या काळात कामाच्या पद्धतीत, कंपनीच्या रचनेत, तंत्रज्ञानात अनेक बदल घडून आलेले असतात आणि या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सज्ज करणे तेवढे सोपे नसते.

स्त्रियांचे दीर्घ आयुर्मान
केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगत असल्याचे दिसून येते. म्हणजेच स्त्रीसाठी निवृत्तीनंतरची पूंजी जास्त असली पाहिजे. दीर्घायुष्य म्हणजे आरोग्यासाठीचा वैद्यकीय खर्च जास्त. त्यासाठी स्वतंत्र नियोजन आवश्यकच ठरते.

गुंतवणुकीबाबत स्त्रियांचा पारंपारिक दृष्टीकोन
सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारची जोखिम घेण्यास प्रतिकूल असतात. सुरक्षित गुंतवणुकीला त्यांचे प्राधान्य असते. कमी परतावा असला तरी त्यात त्या आनंदी असतात कारण त्याठिकाणी पैसा सुरक्षित आहे अशी त्यांची भावना असते. त्यामुळे चांगला परतावा मिळण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात.

भविष्याचा विचार करून आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार गुंतवणूक करताना करावा लागेल.
• कमी वयातच गुंतवणुकीला सुरुवात करा. संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने गुंतवणूक करा. त्यासाठी आपल्याकडे किती वर्षे हाताशी आहेत हे लक्षात घ्या.
• व्यवस्थित दिशादर्शन करणाराविश्वासार्ह आर्थिक सल्लागार शोधा.
• पुरेसे विमा संरक्षण घ्या. जेणेकरून कमाईतील मोठा भाग आजारपण किंवा अन्य गोष्टींवर खर्च होऊ नये. पुन्हा शुद्ध विमा घ्या. विमा हा गुंतवणुकीचा विषय नाही हे लक्षात घ्या.
• अकस्मात निधी तयार ठेवा. तुम्हांला कधीही ब्रेक घेण्याची वेळ आली तर सहा महिने पुरेल एवढी रक्कम हाताशी हवी.
• ब्रेक घेतला तरी सहकाऱ्यांच्या संपर्कात रहा, नवी कौशल्ये शिकत रहा. जेणेकरून तुम्ही तुमच्या क्षेत्रातून बाहेर फेकले जाणार नाही.
• मुख्य म्हणजे कुटुंबातील अर्थविषयक निर्णयात सहभागी व्हा. कुटुंबाचे अर्थकारण आणि व्यक्तींचे अर्थकारण समजावून घ्या.

– चतुर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.