नवी दिल्ली : रेल्वेने आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आणखी एक चांगली सुविधा दिली आहे. देशतील सुमारे 2 हजार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सध्या मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजस्थानातील अजमेर विभागातील राणा प्रतापनगर रेल्वे स्थानक हे मोफत इंटरनेट सेवा असलेले देशातील दोन हजारावे स्थानक ठरले, असे रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित चावला यांनी सांगितले. आमचा चमू दिवसरात्र काम करत असून, दररोज या कामाच्या अंमलबजावणीची गती वाढत आहे. शुक्रवारी आम्ही 74 रेल्वे स्थानक वायफाययुक्त केले आणि अजून काही स्थानकांवर मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, असे चावला यांनी सांगितले. रेल्वेचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेलटेल या कंपनीने डिजिटलयुक्त फलाट तयार करण्यासाठी स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात 1600 स्थानकांवर ही सोय पुरवण्यात आली.