मॉस्को – रशियात विकसित केलेली कोविड-19 विरोधी ‘स्पुटनिक-5’ ही लस संयुक्त राष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मोफत देण्याची तयारी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी दर्शवली आहे. संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या सत्रानिमित्त होत असलेल्या आमसभेतील भाषणामध्ये पुतीन यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.
‘स्पुटनिक-5’ या लसीच्या चाचणीबाबत फारच थोडे अहवाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे या लसीच्या व्यापक वापराबाबत संशोधकांनी साशंकता व्यक्त केली आहे.
या लसीचे ‘साईड इफेक्ट’ भीषण असतील, असे ‘मीम’देखील केले जाऊ लागले होते. या लसीबाबत व्यापक विश्वास निर्माण व्हावा, म्हणून पुतीन यांनी ही लस संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.
संयुक्त राष्ट्रातील काही सहकाऱ्यांच्या मागणीवरूनच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाने पुतीन यांच्या प्रस्तावाबाबत लगेच काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्राच्या कर्मचारी, सदस्यांना ही लस देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले.