भाजी मार्केट, हॉकर्स प्लाझा उभारणीचा मार्ग मोकळा

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि. 18) भाजी मार्केट आणि शॉपिंग सेंटरसह हॉकर्स प्लाझा आणि कमर्शियल ऑफिस इमारत उभारणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून हा ठराव प्रलंबित अवस्थेत पडलेला होता. मात्र मंगळवारच्या सभेत याबाबतीतील एक अत्यंत महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आल्याने या दोन्ही इमारती उभारणीचा मार्ग खुला झाला आहे.

भाजी मार्केट आणि शॉपिंग सेंटर व हॉकर्स प्लाझा आणि कमर्शियल ऑफिस इमारत उभारणीचा विषय सर्वप्रथम 2011 साली सभागृहापुढे आला होता. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी हा विषय मार्गी लागला जात नव्हता. भाजी मार्केट इमारत आणि हॉकर्स प्लाझा ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणच्या मूळ दुकानदारांचे आणि भाजी विक्रेत्यांचे अनेक प्रश्‍न अनुत्तरित होते.

अखेर नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्ष नेत्या शादान चौधरी तसेच अन्य सर्वच लोकप्रतिनिधी सोबत सकारात्मक चर्चा करून हा प्रलंबित विषय मार्गी लावला. या दोन्हीही इमारतीमध्ये सर्व मूळ दुकानदारांना तसेच भाजी विक्रेत्यांना योग्य आकाराचे गाळे प्राधान्याने दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित गाळे आणि दुकाने तसेच कमर्शियल ऑफिस लिलाव पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे.

भाजी मार्केट आणि शॉपिंग सेंटर या इमारतीमध्ये तळ मजल्यासह एकूण तीन मजले राहणार आहे. तळ मजल्यावर 14 दुकाने आणि 41 भाजीचे गाळे, पहिल्या मजल्यावर आठ, तर दुसऱ्या मजल्यावर सात दुकाने बांधण्यात येणार आहे. तर हॉकर्स प्लाझा आणि कमर्शियल ऑफिस इमारतीमध्ये तळ मजल्यावर 12 दुकाने आणि 40 हॉकर्स स्टॉल, पहिल्या मजल्यावर 16, तर दुसऱ्या मजल्यावर 15 ऑफिस शॉप बांधण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या ठरावानुसार या दोन्हीही इमारतीचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करणे, त्यास तांत्रिक मंजुरी घेणे, आर.सी.सी. कामाचे डिझाइन व आराखडे सक्षम स्ट्रक्‍चरल इंजिनिअरकडून करून घेण्याचा कामाला आर्थिक व प्रशासकीय कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे काम लवकरच मार्गी लागतील, अशी चिन्हे निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.