मोफत उपचार केले जाणार
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात दोषी आढळणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. जर कोणी आम आदमी पार्टीचा कार्यकर्त्या यामध्ये दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा देण्यात येईल, अशा शब्दांत केजरीवाल यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण होता कामा नये अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
रविवारपासून ईशान्य दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, या हिंसाचारामधील मृतांचा आकडा वाढला आहे.
दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. दरम्यान, हिंसाचारात जखमी झालेल्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केजरीवाल सरकारने केला आहे. पीडितांसाठी त्यांनी फरिश्ते योजना दाखल केली असून त्या अंतर्गत जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. तसेच हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनाही रोख मदत दिली जाणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.