Narayangaon: नारायणगाव ग्रामपंचायत आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी मोफत ‘आर्ट अँड क्राफ्ट ड्रॉईंग’ उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २०) ते रविवार (दि. ३१ मे) या कालावधीत हे शिबिर होणार असून, ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना त्यात सहभागी होता येणार आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान उपसरपंच योगेश पाटे यांनी दिली. शिबिरात प्रशिक्षक संतोष खुडे हे चित्रकला, हस्तकला आणि पेपर क्राफ्टचे प्रशिक्षण देणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थी मोबाईल, दूरदर्शन तसेच उन्हाच्या तीव्र झळांपासून दूर राहून सर्जनशील उपक्रमांकडे वळण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हे मोफत शिबिर दररोज दुपारी १ ते २ या वेळेत बिरोबा हॉल, पाटे आळी, नारायणगाव येथे पार पडणार आहे. ग्रामपंचायत सदस्या भावना बेल्हेकर, सुप्रिया अडसरे, प्रिया खैरे, सुचिता क्षीरसागर आणि शारदा बाळसराफ यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.