विविधा : फुकटचे सल्ले आणि खमके उत्तर

अश्‍विनी महामुनी

फुकटचे सल्ले देण्यात काही लोकांचा हातखंडा असतो. अगदी वाट्टेल त्या विषयावर आणि वाट्टेल तेव्हा सल्ले देण्यात ते अगदी एका पायावर म्हणतात ना, तसे सज्ज असतात. झोपेतून उठवून काही सल्ला विचारला तरी अगदी उत्साहाने देतील. काहींना-काहींना कशाला, खूप जणांना तर सल्ला विचारायचीही गरज नसते. 24द7 म्हणतात, तसे ते तयार असतात, नव्हे, टपून बसलेले असतात, कावळ्यासारखे, कधी एकदा सल्ला द्यायला मिळतो यासाठी. त्यांच्या सुदैवाने कोणी सल्ला मागायला गेलाच, तर त्याला एकाऐवजी दहा सल्ले मिळतात त्याच्याकडून. त्यासाठी स्थळ, काळ… कशाचेही बंधन नसते.

सामान्यपणे ज्येष्ठ-जाणकार व्यक्तींनी लहानांना-अज्ञ लोकांना, अडचणीत असलेल्यांना सल्ला-तो ही आवश्‍यक असेल तरच द्यावा अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही नसते. एखादा अगदी लिंबू-टिंबू देखील ज्येष्ठ तज्ज्ञाला सल्ला देताना दिसतो.

तो चुकला, त्याने असे करायला नको होते, असे म्हणून, काय करायला पाहिजे होते, असे सांगणारे अगदी छातीठोकपणे, गल्लीबोळातही दिसतात. पूर्वी सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहलीही खेळत असताना (टीव्हीवर पाहात) त्याने अमुक एक फटका कसा मारला पाहिजे होता, किंवा कसा मारायला नको होता असे टीव्ही समोर बसून छातीठोकपणे सांगणारे घराघरात आणि गल्लीबोळात दिसतात. यात मुले असतात आणि त्यांच्या बरोबरीने जाणतेही असतात. तसे पाहिले तर क्रिकेट हा गप्प बसून पाहायचा खेळच नाही. तो पाहात असताना हातापायांची, डोक्‍याची- हालचाल चालूच असली पाहिजे आणि काहीच नाही तर तोंडाचा पट्टा तरी चालला पाहिजे.

खेळाखालोखाल किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सल्लागारांची संख्या राजकारणात असते. आणि ती कोठेही चालते. घरी-दारी, कचेरीत, शाळेत, बसमध्ये, रस्त्याने चालताना…..आणि आता मोबाइलमुळे कोठेही, कधीही आणि कोणाबरोबरही. बरं ही चर्चा करण्यासाठी बोललेच पाहिजे असे काही नाही. न बोलताही ते काम करता येते, व्हॉट्‌स ऍप, मेसेंजर आदी माध्यमातून. तासन्‌तास चालणारा आहे हा खेळ.

ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार खासदार ते मंत्री-अध्यक्षांपर्यंत आणि ट्रम्प-पुतीन-किम जोंग उन पर्यंत सर्वांना फुकटची सल्लामसलत कधी कधी मात्र सल्ला देणाराच्याच अंगावर येतो सल्ला. मग पळ काढता काढता किंवा तोंड लपवता लपवता पुरे होऊन जाते. या संबंधात दोन व्हायरल गोष्टी आठवतात.

एक कॅनडातील आहे. मानवतावादी, म्हणजे ह्युमनेटेरियन की काय म्हणतात ना, त्यांची. ही एक नस्ता उच्छाद मांडणारी जमात असल्याचे आमच्या मामांचे मत आहे. विशेषत: गुन्हेगार-दहशतवादी अशा जमातीबद्दल यांना मोठा पुळका. आपल्या देशातही. बुरहान वानी, याकूब मेमन, अफजल गुरू अशासांठी गळे काढणारे खूप.

प्रश्‍न तो नाही, तर कॅनडातील एका मानवाधिकार कार्यकर्तीचा आहे. (आता तो सोशल मीडियावरील असल्याने किती खरा, किती खोटा हा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. पण गोष्ट आहे विचार करण्यासारखी.) कॅनडा सरकारला पत्रावर पत्रे पाठवून ती कैदेत असलेल्या तालिबानी आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांना मिळणाऱ्या (तथाकथित) अमानवीय वागणुकीबद्दल सल्ले देऊन सतावत असे. अखेर कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांनी तिच्या पत्राला उत्तर दिले. त्यात लिहिले, दहशतवाद्यांबद्दल तुमच्या मनात असलेल्या अतीव करुणेने आमचे हृदय भरून आले आहे. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला आहे, की मोम्म्मद बिन मेहमूद नावाच्या एका दहशतवाद्याला तुमच्या देखरेखीखाली तुमच्या घरी ठेवण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार त्याच्याबरोबर मानवीय दृष्टिकोनातून वर्तणूक ठेवता येईल. फक्‍त काही गोष्टींची सूचना देऊन ठेवतो-हा अत्यंत खतरनाक, खुनशी, क्रूरकर्मा दहशतवादी आहे. मानवाधिकार आणि सद्‌व्यवहाराने तुम्ही त्याला सुधारू शकाल. पण हे करताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे हितावह ठरेल- -साबण, पेन्सिल, खिळे अशा सामान्य गोष्टीतून तो बॉंब बनवू शकतो. त्या त्याच्या हाती लागू देऊ नयेत. अफगाणिस्तानातील असल्याने महिलांचा ड्रेस कोड, बोलणे-चालणे-वागणे याबाबत त्याची ठाम मते आहेत. तुम्ही, तुमच्या मुली तेवढी खबरदारी घ्यालच. मानवाधिकारासाठी हे सारे तुम्ही हसत हसत कराल यात काही शंका नाही.

तरी त्याला कधी पाठवायचे ते कळवावे. त्यानंतर त्या मानवाधिकारी महिलेने आजतागायत त्यांच्याशी संपर्क साधला नाही. ती गायबच झाली. दुसरी ताजी आहे आपल्याकडचीच एयरस्ट्राईकनंतर इम्रान खानने भारत सरकारला हात जोडून विनंती केली म्हणे पाहिजे तर आणखी बारा बॉंब टाका, पण तुमच्या व्हॉट्‌सऍपवाल्यांना आवरा!

Leave A Reply

Your email address will not be published.