वाघोली : खराडी आणि वाघोली परिसरातील नागरिकांसाठी रेल्वेने मोफत श्री महाकालेश्वर तथा उज्जैन यात्रेचे आयोजन वाघोलीच्या सरपंच तथा माजी सभापती पंचायत समिती हवेली वसुंधरा उबाळे व माजी सरपंच शिवदास उबाळे यांच्या परिवाराकडून आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाची वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.
वाघोली तालुका हवेली येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात रेल्वेने देवदर्शन यात्रा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये दोन्ही गटांच्या इच्छुक उमेदवारांनी देवदर्शन यात्रेचा लाभ मिळून दिला होता.
देशाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार या पवार कुटुंबीयांबरोबर अनेक वर्षापासून ऋणानुबंधाचे संबंध असलेल्या उबाळे परिवाराने मोफत उज्जैन यात्रा नागरिकांसाठी उपलब्ध केल्याने आगामी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत या उज्जैन यात्रेचा प्रभाव पडू शकतो अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
सध्या माजी सरपंच शिवदास उबाळे आणि माजी सरपंच वसुंधरा उबाळे या कुटुंबीयांकडून राबवलेल्या उपक्रमाची वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. वाघोली आणि खराडी मधील नागरिकांनी जास्तीत जास्त श्री महाकालेश्वर यात्रेचा रेल्वेने अनुभव घ्यावा असे आवाहन माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी केले आहे.