मुक्‍त परवान्यांमुळे… रिक्षा झाल्या उदंड

साताऱ्यात मुजोरी कायम
स्टॉप ओसंडून रिक्षा उभ्या राहताहेत अस्ताव्यस्त

सातारा – ऐतिहासिक सातारा शहराला कधी काळी सुसंस्कृत रिक्षावाल्यांचे शहर असेही संबोधले जायचे. आज मात्र मग्रूर आणि मुजोर रिक्षावाल्यांचा सातारा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. परवाने मुक्‍त झाल्याने रिक्षांची संख्या वाढली असून शहराच्या वाहतुकीवर मोठा ताण पडला आहे. असे असताना राजवाडा सोडाच शहरातील इतरही रिक्षास्टॉप ओसंडून वाहतात की काय, अशी गंभीर परिस्थिती झाली आहे, असे असताना अडवून भाडे घेणे, मीटर न टाकणे आणि मग्रुर, धमकीवजा भाषा वापरुन प्रवाशांना दम भरणे, असे प्रकार काही रिक्षावाल्यांकडून होऊ लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

काही दिवसांपूर्वी दोन अडीच हजार रिक्षांची संख्या असलेल्या सातारा शहरात कोणी नवीन पाहुणा आला की पहिली हाक मारायचा ती रिक्षावाल्याला. अगदी रस्ता आणि पत्ता विचारणाऱ्यांनादेखील साताऱ्यातील रिक्षावाल्यांवरच मोठा भरवसा होता. इतर शहरातील रिक्षावाले चुकीचा पत्ता सांगून जास्त पैशांसाठी गल्लीबोळातून फिरवतील. पण, साताऱ्यातील रिक्षावाले त्याला नेहमीच अपवाद ठरले आणि त्यामुळेच रिक्षावाले हे सातारा शहराचे भूषण आहेत, अशी कौतुकाची थाप कधीकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनीही जाहिररित्या दिली होती. आता मात्र दिवस फिरले आहेत.

काही महिन्यांपासून रिक्षा परमिट देण्यावरील निर्बंध उठवण्यात आले. झाले गेल्या आठ-दहा महिन्यांतच दोन अडीच हजारावर असलेल्या रिक्षांची आकडेवारी आजमितीला साडेचार ते पाच हजारांच्या घरात पोहचली. आधीच रस्त्यांमुळे आणि खास करुन ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे हैराण झालेल्या सातारकर प्रवाशांना रिक्षावाले अडवून पैसे मागू लागले. वळसा मारुन जावे लागते, पेट्रोल जास्त जाते. ही कारणेही रास्तच म्हणावी लागतील पण, काही रिक्षावाल्यांमुळे मात्र रिक्षावाल्यांच्या सुसंस्कृत परंपरेला गालबोट लागत आहे.

राजवाडा म्हणजे सातारा शहराचे हृदय. या ठिकाणी खास रिक्षांसाठी मध्यभागी रिक्षा स्टॉप ठेवण्यात आला आहे. या रिक्षा स्टापॅमध्ये एकावेळी 50 ते 60 रिक्षा लावण्याचा नियम आहे. याच पध्दतीने सातारा शहरातील इतर रिक्षास्टॉपवर त्या-त्या जागेच्या प्रमाणात 4, 8, 10, 12 अथवा पंधरा रिक्षा उभ्या करण्याचा वाहतूक नियंत्रण शाखेचा नियम आहे. रिक्षा उदंड झाल्याने रिक्षास्टॉपवर त्या मावणार कशा, रोजीरोटीसाठी धावणाऱ्या रिक्षावाल्यांनी तरी काय करायचे, हेही खरे असले तरी, दुसऱ्याला त्रास देणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक करु लागले आहेत.

त्याला कारणेही तशीच आहेत. राजवाडा रिक्षा स्टॉप 50 ते 60 रिक्षांनी फुल्ल झालेला असतो. अशातच रिक्षास्टॉपच्या आजूबाजूनेही अस्ताव्यस्त रिक्षा लागलेल्या असतात. आता तर चक्‍क गोलबागेच्या चोहोबाजूनी आणि चौपाटीच्या (गांधी मैदान) समोर तर रिक्षांची भलीमोठी रांग कधीकधी मोती तळ्याच्या कॉर्नरपर्यंत पहावयास मिळते. आधीच निमुळता रस्ता त्यात या आडव्यातिडव्या लागलेल्या रिक्षा, यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. रहदारीचा रस्ता आणि वाहतूक कोंडी यामुळे याठिकाणी अनेकदा वादावादी आणि हाणामारीचे प्रकार घडतात. याच ठिकाणी कोणी हटकल्यास रिक्षावाल्यांची मुजोरी आणि मग्रुरी पहायला मिळते.

राजवाडाच नव्हे तर, शहरातील इतर सर्वच रिक्षा स्टॉपवर मर्यादेपेक्षा जास्त रिक्षा लावल्याचे पाहावयास मिळते. या ठिकाणीही वाहतूक कोंडी आणि वादावादीचे प्रकार पाहायला मिळतात. रिक्षावाले एवढे बेशिस्त वागत असताना वाहतूक पोलीस फक्‍त पावती फाडण्यात मग्न असतात. तर, आरटीओवाले नेहमीच गांधारीच्या भूमिकेत. सातारा शहराच्या वाहतूकीला शिस्त आणि वळण लवायचे असेल तर, प्रथम रिक्षावाल्यांची मुजोरी थांबवा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

मिसरुड नाही पण, तोंड चालतंय…
अनेक रिक्षामालकांनी स्वत: रिक्षा न चालवता ड्रायव्हर ठेवलेले असतात. अशातच रिक्षा चालवण्याचा परवाना नसलेले अनेक जण रिक्षा चालवून उपजिविका चालवत आहेत. मात्र, यातीलच काही महाभाग ओठावर मिसरूड नाही, पण तोंडातून शिव्या देत प्रवाशांना दमदाटी करत असल्याचे बोलले जाते. काही जण तर, दारूच्या नशेत तर्र असतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारत रिक्षा चालवत असल्याचेही निदर्शनास येते. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, असे मत प्रवाशी व्यक्‍त करत आहेत.

कडक कारवाई करणार – संजय राऊत
या गंभीर प्रश्‍नाकडे शहर वाहतूक शाखेकडून कानाडोळा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या समस्येबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांना संपर्क केल्यावर दै. “प्रभात’शी बोलताना त्यांनी “मुजोर आणि बेशिस्त रिक्षावाल्यांवर कडक कारवाई करणार,’ असे सांगितले. बेशिस्त आणि नियमबाह्य वागून कोणीही प्रवाशांना वेठीस धरू नये. बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्यांवर धडक मोहीम राबवून तातडीने कायदेशीर कारवाई करू, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.