न्यायाधीश मुळे : नागरिकांना कायदेविषयक मोफत सहाय्य
भोर – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार भोर तालुका विधी सेवा समितीतर्फे विधी सेवा सप्ताह सुरू आहे, हा सप्ताह शनिवार (दि. 23) पर्यंत चालणार असल्याचे समितीचे अध्यक्ष तथा भोरचे दिवाणी न्यायाधीश एस. के. मुळे यांनी सांगितले.
न्यायाधीश मुळे म्हणाले की, विधी सेवा प्राधिकराणाचा समाजातील दुर्लक्षीत पीडीत व असह्य नागरिकांना लाभ मिळावा हा या जनजागृती मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांचा होणारा खर्च, वेळेची बचत, तसेच तांत्रिक बाबींचा अडसर टाळून जलद गतीने न्याय देणे, लोकन्यायालय आयोजित करणे यासाठी विविध प्रकारच्या वादांमध्ये पक्षकारांना कायदेविषयक मोफत सहाय्य करण्यात येत आहे.
अनूसुचित जाती, जमाती, अवैध मानवी व्यापारातील बळी किंवा भिकारी, महिला अथवा बालके, मानसिक असमर्थतांनी ग्रस्त व्यक्ती, सार्वत्रिक आपत्ती, जातीय हिंसाचार, जातीय अत्याचार, पूर, दुष्काळ, भूकंप किंवा औद्योगिक आपत्तीचे बळी, औद्योगिक कामगार यांना मानसिक रुग्ण, किशोरवयीन अपराधी, न्यायालयीन कोठडीतील व्यक्ती व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजारांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना विधी सेवा प्राधीकरण, समिती मोफत विधी सेवा पुरते, असे त्यांनी नमूद केले. समितीकडे पक्षकारांनी अर्ज करणे आवश्यक असून न्यायालयाचे लेखनिक सुशांत बुनगे यांच्याकडे संपर्क साधावा तसेच या कामी वकील संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या मार्फत मदत घेता येणार आहे.