कामगार नेते इरफान सय्यद यांची माहिती
पिंपरी – महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने उद्योगनगरीतील कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या परिवाराकरिता मोफत आरोग्य उपचार केंद्राची सोय उपलब्ध केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये सुमारे सात हजार माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती कामगार नेते इरफान सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात प्रथमच माथाडी कामगारांसाठी राबविला जाणारा हा अभिनव उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
इरफान सय्यद म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, कामगारांची नगरी म्हणून ओळख आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक शहरात आपल्या उदरनिर्वाहासाठी येतात. कामगार आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांच्याकडे अधिकचे पैसे नसतात. त्यामुळे कष्टकरी कामगार त्याकडे दुर्लक्ष करतात. उपचार घेत नाहीत. त्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत.
परिणामी, आजार बळावतो. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठीच महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने कष्टकऱ्यांसाठी आणि त्यांच्या परिवाराकरिता आरोग्य उपचार केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामध्ये सुमारे सात हजार माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्या करण्यासाठी मोफत हेल्थकार्डचे जून महिन्यात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे. माथाडी, असंघटित कामगारांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व माथाडी कामगारांनी मोफत आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा. आरोग्य कार्ड मिळविण्यासाठी 9960633888 या मोबाईल क्रमांवर संपर्क साधावा.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, सहसचिव प्रवीण जाधव उपाध्यक्ष खंडू गवळी, भिवाजी वाटेकर, आप्पा कौंदरे, प्रदीप धामनकर, संदीप मधुरे, ज्ञानोबा मुजूमले, आबा मांढरे, बांगर मामा, पांडूरंग काळोखे, संतिश कंठाळे, गोरक्ष दुबाले, राजू तापकीर, बाबासाहेब पोते, अभय म्हात्रे, अशोक साळुंखे, समर्थ नाईकवाडे, बबन काळे, उद्धव सरोदे, बळीराम कंठाळे, ज्ञानदेन पाचपूते, प्रभाकर गुरव, मारुती वाळूंज, ज्ञानेश्वर घनवट, विजय खंडागळे, चंद्रकांत पिंगट, डॉ. समिर देशमुख, डॉ. महेश शेटे, डॉ. सुभाष निकम, डॉ. देविराज पाटील
उपस्थित होते.
या परिसरात असणार आरोग्य केंद्रे!
रूपीनगर, चिखली, म्हेत्रेवस्ती, नाशिकफाटा, संत तुकारामनगर, उर्से, नाणेकरवाडी अशा विविध परिसरामध्ये या आरोग्य उपचार केंद्राची सोय करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रात कामगारांच्या हृदयरोग, किडनी, हाडांचे व मणक्याचे आजार, कान, नाक घसा, नेत्ररोग, लहान मुलांचे आजार अशा विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच सोनोग्राफी, सिटी-स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, टू-डी इको, सोनोग्राफीही सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे.