पुणे, – आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील शिक्षण आणि प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या शनिवारी ७ डिसेंबर ग्लोबल एज्युकेशन फेअर आयोजित करण्यात आले आहे. यात जगभरातील 40 नामांकित परदेशी विद्यापीठे सहभागी होणार आहेत, तसेच विद्यापीठांचे प्रतिनिधी विद्यार्थी व पालकांना विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे आदी उपस्थित होते.
ग्लोबल एज्युकेशन फेअरचा मुख्य उद्देश हा विद्यार्थी- पालकांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा अशा १३ पेक्षा अधिक परदेशी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया माहिती व्हावी, त्यासाठी लागणाऱ्या पात्रता परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळावे, प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, असा असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले. यात पुण्यातील खासगी विद्यापीठांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती
परदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी आईएलटीएस, टोफेल, जीआरई अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. मात्र, या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, या उद्देशाने विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.