पुणे – ऑनलाइन पद्धतीने टोल वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागील पाच दिवसांपासून वाहनधारकांना मोफत फास्टॅग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे विभागातील पाच टोलनाक्यांवर मोफत फास्टॅग मिळण्याची सुविधा उपलब्ध केल्याची माहिती एनएचएआयने दिली.
टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होऊन ऑनलाइन पद्धतीने टोल वसुलीसाठी केंद्र शासनाकडून वाहनांना फास्टॅग बसवण्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपासून टोलनाक्यांवर याची अंमलबजावणी सुरू केली. तसेच, वाहनधारकांनी ते बसवून घेण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून वाहनधारकांना 15 ते 29 फेब्रुबारीदरम्यान मोफत फास्टॅग उपलब्ध करून देण्याच्या सूचना एनएचएआयला दिल्या आहेत. एरवी फास्टॅगसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. या दिवसांत हे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, फास्टॅगसाठी ठेवावी लागणारी अनामत रक्कम व वॅलेटमध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक याविषयीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असतील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
फास्टॅग वापरण्यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मोफत फास्टॅग सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये, पुणे विभागातील पाच टोलनाक्यांचा समावेश आहे. यामुळे फास्टॅग वापरणाऱ्या वाहनांची संख्या निश्चितपणे वाढण्याची शक्यता आहे.
– सुहास चिटणीस, प्रकल्प अधिकारी, एनएचएआय