पुणे – ऑनलाइन पद्धतीने टोल वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील 15 दिवस वाहनधारकांना फास्टॅग मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुणे विभागातील वाहनधारक यापासून वंचित राहात आहेत. याबाबत प्राधिकरण अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत.
टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होऊन ऑनलाइन पद्धतीने टोल वसुलीसाठी केंद्र शासनाकडून वाहनांना फास्टॅग बसवण्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपासून टोलनाक्यांवर याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. उर्वरित वाहनधारकांनी ते बसवून घेण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वाहनधारकांना दि.15 ते 29 फेब्रुबारी या कालावधीत मोफत फास्टॅग उपलब्ध करुन देण्याच्या सूचना “एनएचएआय’ने दिल्या आहेत.
एरवी फास्टॅगसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. या 15 दिवसांत हे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, फास्टॅगसाठी ठेवावी लागणारी अनामत रक्कम व वॅलेटमध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक याविषयीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असतील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. महामार्गांवरील टोलनाके, आरटीओ कार्यालये, सामायिक सेवाकेंद्रे, पेट्रोल पंप अशा ठिकाणी नि:शुल्क फास्टॅग मिळू शकतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या सूचना मिळाल्या नसल्याचे पुणे विभागातील अधिकारी सांगत आहेत. यामुळे मोफत मिळणाऱ्या फास्टॅगपासून नागरिक वंचित राहत असून त्यांना खासगी वितरकाकडे धाव घ्यावी लागत आहे.