सील केलेल्या भागांत नागरिकांचा मुक्‍त संचार

पुणे – महापालिकेने सील केलेल्या भागात बॅरिकेडींग करूनही अनेक नागरिक गांभीर्य नसल्याने मुक्‍तसंचार करताना दिसत होते. दुपारनंतर मात्र या भागात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राऊंड मारून येथील बंदोबस्त कडक करण्याच्या सूचना दिल्या.

कोंढवा, मार्केटयार्ड ते आरटीओ परिसर सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी सोमवारी दिले. रात्री 12 वाजता त्याची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळी या भागात बॅरिकेडींग केले. मात्र तरीही या व्यवस्थेला न जुमानता अनेकांनी बाहेर फिरून शौर्य दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही भागातील मुक्‍तसंचार पाहून पोलिसांनी त्यांना तंबी दिली आणि घरांमध्ये हुसकावून लावले. परंतु, पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा ते रस्त्यावर येत होते.

उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून आढावा
करोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌, महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस सहआयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती.

नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था पोलीस विभागातर्फे समुपदेशन करून प्रशासन आपल्या पाठिशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे, अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

पूर्व भाग सील असला तरी मार्केट यार्ड सुरुच
करोना संसर्ग वाढीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पूर्व भाग महापालिकेने सील केला आहे. तरी या भागात असणारे मार्केट यार्ड अत्यावश्‍यक सेवा म्हणून सुरुच आहे. मंगळवारी 352 वाहनांतून 7 हजार 300 क्विंटल शेतमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. गर्दी होऊ नये, यासाठी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्ड रोटेशननुसार चालविण्यात येत आहे. मंगळवारी (दि.7) भाजीपाला बाजार सुरू होता, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. दरम्यान मोशी उपबाजारात 115 वाहनांमधून 2 हजार 300 क्विंटल शेतमालाची आवक झाली असून, गर्दी होत असल्याने मांजरी उपबाजार बंद ठेवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.