मोफत … चिकन अन् मसुरा थाळी..!

इस्लामपुरातील शिवभोजन केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

इस्लामपूर (विनोद मोहिते) – मोफत चिकन अन् मसुरा थाळी..! हो वाचून नवल वाटलं ना.. पण एका ध्येयवेड्या तरुणाने आपल्या शिवभोजन केंद्रात पहिल्या वर्धापनदिनानिमित्त दीडशे जणांना मोफत चिकन अन् इस्लामपुरच्या अख्या मसुराची भरपेट मेजवानी दिली.

इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या शेजारी असणाऱ्या हॉटेल पंगत येथे महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्राचा मंगळवारी पहिला वर्धापनदिन होता. सकाळी येथे नागरिकांच्या उपस्थितीत अभयसिंह आनंदराव पवार या दोनवर्षीय चिमुकल्यांच्या हस्ते वाढदिवस व वर्धापनदिनानिमित्त केक कापण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी चिकन व इस्लामपुरच्या अख्या मसुराचा आस्वाद घेतला. केंद्र संचालिका अलका शिंदे आणि रणजित शिंदे यांनी स्वागत केले.

गेले वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या पाच रुपयांत शिवभोजन थाळी गरीब गरजू नागरिकांची भूक भागवत आहे. आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने केंद्राच्या आवारात मंडप घालण्यात आला होता. सर्व कामगारांनी नवनवे कपडे परिधान केले होते. येणाऱ्या प्रत्येक गरजू भुकेल्या व्यक्तीचे आदराने स्वागत केले गेले आणि मोफत चिकन, मसुरा थाळी देण्यात आली. दीडशे जणांनी शाकाहारी व मांसाहारी थाळीवर ताव मारला.

सध्या गरिबांच्या घरी चूल पेटणे मुश्कील झाले आहे. मटण-चिकनचे वाढीव दर खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे गरिबांच्या ताटात चिकन देण्यात आले. चिकन व मसुरा खाऊन नागरिक तृप्त झाले. भरपेट जेवल्यानंतरचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

कोरोनाच्या परिस्थिती पुन्हा गंभीर होत आहे. पुन्हा लॉक डाऊन होईल अशी परिस्थिती आहे. अनेकांची एकवेळ खाणे अन् जगण्याची धडपड सुरू आहे. गेल्या वर्षभरात शिवभोजन केंद्रावर तब्बल ५२ हजारांहून अधिक थाळीचे वितरण झाले आहे. मंगळवारी वर्धापनदिन असल्याने केंद्र संचालिका अलका शिंदे यांनी आपल्या सहकारी सुलाबाई साळुंखे,अनिता शिंदे व घरातील महिलांच्या मदतीने चिकनचा बेत आखला. रोजच्या दीडशे गरजू नागरिकांना चिकन व मसुराचा आस्वाद घेता आला.

अत्यंत गरजूंना शिवभोजन थाळी जगण्याचा हातभार आहे. यापूर्वीही दिवाळी, दसऱ्यासह वेगवेगळ्या सणासुदीला गोड-धोड जेवण दिले गेले आहे. महाशिवरात्रीला फराळाची थाळी होती.

शिवभोजन केंद्रात गरिबांच्या चेहऱ्यावर दररोज आनंद न्याहाळता येत असल्याची प्रतिक्रिया संचालिका अलका शिंदे यांनी दिली. उमेश पवार, सागर मलगुंडे,सीमा कदम,ऋषिकेश शिंदे, संजय गायकवाड, रामचंद्र चव्हाण,सोमनाथ माने, किर्तीकुमार पाटील उपस्थित होते. रणजित शिंदे यांनी संयोजन केले.हणमंत हिंदुराव कदम यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.