बारामतीत 307 रुग्णांची मोफत अँजिओग्राफी

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राबविले जातेय हृदयरोग शिबीर
बारामती  (प्रतिनिधी) – आमदार रोहित पवार व येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या संयुक्‍त विद्यमाने सुरू असलेल्या हृदयरोग शिबिरात 12 डिसेंबरपासून आजपर्यंत 307 रुग्णांची मोफत अँजिओग्राफी, 29 बायपास सर्जरी व तब्बल 109 रुग्णांवर मोफत अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. या शिबिरामुळे सामान्य रुग्णांचा सुमारे 2 ते 2.50 कोटींचा खर्च वाचला आहे.

गेल्या काही वर्षांपासून रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनंत आरोग्य अभियान राबवित आहेत. या अभियान व बारामतीतील कै. रा. तु. भोईटे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत हे शिबिर भरवत आहेत. आतापर्यंत 4 वर्षांत या शिबिरातून 1 हजार 161 अँजिओग्राफी व 498 अँजिओप्लास्टी व 52 बायपास सर्जरी झाल्या असून 8.25 कोटी रुपयांचा रुग्णांचा खर्च वाचला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी आजवरच्या राजकीय कारकीर्दीत सामान्य व्यक्‍ती केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिबीरांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबावर आलेले आजाराचे संकट कमी करण्याचा प्रयत्न होतोय हे महत्त्वाचे आहे. या शिबिरात पुणे, नगर तसेच इतरही ठिकाणच्या रुग्णांना वाटल्यास पुण्यातील दवाखान्यांमध्येही मोफत शस्त्रक्रिया व अल्प दरात अँजिओग्राफीची व्यवस्था करू. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्ण अथवा नातेवाईकांनी रोहित पवार संपर्क कार्यालय संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

माझे वडील जगन्नाथ म्हेत्रे यांना एका वर्षापासून हृदयरोगाचा त्रास होता. बारामतीच्या शिबिराबाबत माहिती मिळाल्यानंतर तेथे दाखल केले. शस्त्रक्रिया पार पडली. चांगली सुविधा मिळाली. या शिबिरामुळे माझे वडील पुन्हा पूर्ववत शेतीतील काम व इतर दैनंदिन गोष्टी विनासायास करू शकले आहेत.
– विजय म्हेत्रे, कर्जत (जि. नगर)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.