पुणे, दि. 1 -राज्यातील “टीईटी’ घोटाळेबाज शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी रद्द करण्याच्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना बजाविले आहेत.
“टीईटी’ परीक्षेच्या निकालात फेरफार करुन अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार करुन हे प्रकार झाल्याचे पुणे पोलिसांनी उघडकीस आणले. त्यावर शासनाने संबंधित घोटाळेबाज उमेदवारांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळामध्ये कार्यरत असलेल्या “टीईटी’ घोटाळेबाज शिक्षकांच्या सुनावण्या घेऊन कारवाई करण्याबाबतचे आदेशही देण्यात आले होते. प्रत्यक्षात विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून कारवाईचे अहवालच प्राप्त झालेले नाहीत.
आता तातडीने अंतिम अहवाल सादर करावेत. अन्यथा दिरंगाई झाल्याच्या परिणामाची जबाबदारी निश्चित करुन नियमाप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालकांवरच कारवाई प्रस्तावित करण्याचा इशाराही शिक्षण संचालकांनी दिला आहे. “टीईटी’ घोटाळेबाजांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी युवाशाही संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर नुकतेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अश्विनी कडू, तुषार देशमुख, तुषार शेठे, चतुरसिंग सोळुंके, प्रल्हाद भोसले, विजय पाटील, सुधीर पाटील आदींनी सहभाग घेतला.