नागरिकांना बसतोय हजारोंचा गंडा : प्रकार रोखण्याचे सायबर सेल समोर आव्हान
पुणे – गुगल पे किंवा फोन पे डाऊन लोड करणे आणि त्याद्वारे पेमेंट करणाऱ्या नागरिकांना हजारोंचा गंडा बसत आहे. सायबर चोरटे याद्वारे नागरिकांच्या बॅंक खात्यातील हजारो रुपये काढून घेत आहे. नागरिकांना पेमेंटसाठी हे ऍप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांच्या बॅंक खात्यातील पैसे काढले जात आहेत. तर काही घटनांमध्ये या ऍपद्वारे पेमेंट करण्यास लावून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हे फसवणुकीचे प्रकार रोखण्याचे आव्हान सायबर सेलसमोर आहे.
दोन महिलांनी ओएलएक्सवर जुने फर्निचर विकायला काढले होते. त्यांचे पेमेंट करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करण्यात आली. विश्रांतवाडी येथ राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात गुगल पे धारक व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिलेने ओएलएक्स वेबसाइटवर घरातील जुने फर्निचर विक्री करण्याबाबत जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून एका मोबाइलधारकाने त्यांना कॉल करून मला डायनिंग टेबल घ्यायचा आहे; परंतु मी गुगल पे वरून पैसे पाठतो, तुम्ही गुगल पे डाऊन लोड करा, असे सांगितले.
त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातील तब्बल 50 हजारांची रक्कम काढून घेऊन फसवणूक केली.तर दुसऱ्या एका घटनेत धानोरी येथे राहणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेचीही 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. तिने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात फोन पे धारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत.
क्विकर ऍपवरील दुचाकी विकत घेणाऱ्याला 50 हजार 560 रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात ऑनलाइन फोन पे आणि पेटीएमधारक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धायरी येथे राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने क्विकर ऍपवर एक जुनी दुचाकी विक्रीसाठी असल्याचे पाहिले होते. त्याने संबंधित मोबाइलधारक विक्रेत्याशी संपर्क केला.
दुचाकीचा व्यवहार 25 हजारांत ठरला होता. मात्र, कुरियर बॉ, मॅनेजर, एक महिला आदींनी दुचाकीचा विमा, ट्रान्सपोर्ट आदी कारणांसाठी तब्बल 50 हजार 560 रुपये ऑनलाइन फोन पे आणि पेटीएमद्वारे देण्यास भाग पाडले. पैसे दिल्यानंतरही दुचाकी न मिळाल्याने फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) ताकवले करत आहेत.