वैयक्तिक माहिती विचारून फसवणुकीच्या घटना वाढल्याच्या तक्रारी
कोणतीही गोपनीय माहिती न देण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे – नागरिकांना फेक कॉलद्वारे चुकीची माहिती सांगून त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मागितले जाते. या माहितीआधारे नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना भविष्य निर्वाह निधी अर्थात “पीएफ’ कार्यालयाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही फेक कॉलला प्रतिसाद देऊ नये, तसेच स्वतःच्या पीएफ, पेन्शन खात्यासंबंधीची व बॅंक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पीएफ कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पुणे विभागाचे आयुक्त अरुणकुमार म्हणाले, “गेल्या काही काळात नागरिकांनी कॉलद्वारे त्यांचा आधारकार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर), बॅंक खाते, ओटीपी, पासवर्ड, तसेच पीएफ खात्याविषयी माहितीसाठी विचारणा करण्यात आल्याची तक्रार केली आहे.
पीएफ कार्यालयामार्फत अशी कोणत्याही प्रकारची माहिती मागवण्यात येत नाही. तसेच पीएफ कार्यालयातर्फे कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्यास पैसे भरण्यास सांगण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या बाबींची दखल घेऊन स्वत:ची वैयक्तिक माहिती कोणालाही सांगू नये.’