पुणे – पोलीस बनण्याची हौस फॅब्रिकेशन व्यावसायिकाला भलतीच महागात पडली. सेवानिवृत्त पोलिसामुळे या बोगस पोलिसाचा पर्दाफाश झाला. वानवडी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. भाऊसाहेब गोयकर (25, रा. गुरव पिंपरी, थेटेवाडी, ता. कर्जत, सध्या मेदनकरवाडी, चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे.
भोयकर हा पोलिसाची वर्दी घालून पत्नीसह चालला होता. यावेळी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शशीकांत तेलघुने यांना वर्दी संशयास्पद वाटली. ते चौकशी करत असताना, गोयकर हा वाद घालत होता. दरम्यान, वानवडीचे सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव, हवालदार राजु रासगे, पोलीस नाईक योगेश गायकवाड, शिपाई नवनाथ खताळ यांचे पथक एका कारवाईसाठी तेथून जात होते. त्यांना तेलघुने हे वर्दीवरील भोयकरशी वाद घालताना दिसले. यामुळे चौकशी केली असता, तेलघुने यांनी भोयकर याच्या खांद्यावर “मपो’ ऐवजी “मपोसे’ असा बॅच असल्याचे दाखवत गोयकर हा बोगस पोलीस असल्याचा संशय व्यक्त केला.
ही वर्दीदेखील पोलीस वर्दीशी मिळतीजुळती नव्हती. ओळखपत्र मागितल्यावर गोयेकरकडे गडबडला. त्याला खाक्या दाखवताच पोलीस नसल्याचे त्याने कबूल केले. तो पत्नीच्या बॅंकिंग पेपरसाठी रामटेकडीला जात होता. यामुळे पत्नीला परीक्षा देण्यासाठी सोडण्यात आले. तर, गोयेकरची चौकशी करण्यात आली. त्याची बुलेटही ताब्यात घेण्यात आली.
अंगझडतीत ऍन्टीक्राइम व ऍन्टी करप्शन इंटेलिजन्स सेल असे ओळखपत्र त्याच्याकडे सापडले. त्यावर “पोलीस निरीक्षक’ असा हुद्दा होता. त्याने पोलीस होण्याची हौस असल्याने वर्दी घालून फिरत असल्याचे सांगितले. ही वर्दी चाकण येथून शिवून घेतली होती. पोलीस असल्याचे भासवून कोणाची फसवणूक केली आहे का ? याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.
…म्हणून केला खटाटोप
गोयेकर हा 12 वी पास, तर त्याची पत्नी इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. त्याने विवाहावेळी सासरच्या मंडळींना इंजिनिअर असल्याचे सांगितले होते. हे खोटे असल्याचे उघड झाल्यावर पत्नी स्वतंत्र राहात होती. दरम्यान, त्याने पोलिसांच्या वर्दीची माहिती ऑनलाइन घेत तसे कपडे शिवले. वर्दीवर सासरवाडीला जात त्याने पोलिसांत भरती झाल्याचे सांगितले. यानंतर पत्नीला माहेरी घेऊन आला होता.