फसवणूक केल्याप्रकरणात महिलेला पोलीस कोठडी
पुणे – खासगी वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजुर करून देण्याच्या अमिषाने महिलेची सात लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एका महिलेला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्या महिलेला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
मनीषा अमोल नाले (वय 31, रा. नानापेठ) असे त्या महिलेचे नाव आहे. अशोक तोष्णीवाल (वय 50), कमलेश तोष्णीवाल (वय 35, दोघे रा. 255, नाना पेठ) आणि मनीषा उर्फ सीमा नारायण ढोणे (रा. काळेवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल आहे. उत्तमनगर येथे राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. तोष्णीवाल, ढोणे यांनी फिर्यादींना खासगी वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले होते. त्यानंतर फिर्यादींकडून कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी वेळोवेळी सात लाख 66 हजार रुपये घेतले. दरम्यान, कर्ज मंजूर न झाल्याने त्यांनी आरोपींकडे पाठपुरावा सुरू केला. त्यावर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेला पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील ऍड. ज्ञानेश्वर मोरे यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तर, बचाव पक्षाच्या वतीने ऍड. सुचित मुंदडा यांनी पोलीस कोठडीस विरोध केला.