गुन्हा दाखल; डॉक्टर इस्टेट एजंट पसार
पुणे – व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने मंडप व्यावसायिकाची चार कोटी पाच लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात डॉक्टर इस्टेट एजंट विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे.
या प्रकरणी डॉ. अब्दुल रेहमान अंजारिया (रा. मदीना मशीदजवळ, विक्रोळी, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंडप व्यावसायिक धनश्याम मोगल काची (वय 72, रा.रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार मंडप व्यावसायिक काची यांची अंजारिया याच्या बरोबर 2012 मध्ये ओळख झाली होती.
हडपसर भागातील हांडेवाडीतील एका जागेच्या मालकीबाबत वाद सुरू होते. अंजारियाने त्यावेळी काची यांना मदत केली होती. या जमीन व्यवहारातून मंडप व्यावसायिकाला मोठी रक्कम मिळाली होती.
दरम्यान, अंजारियाने त्यांना ठाण्यातील अंजारिया ऍटो वल्र्ड कंपनी तसेच ए अँड के रिएलटी फर्ममध्ये भागीदारीचे आमिष दाखविले. धनादेशाद्वारे वेळोवेळी चार कोटी पाच लाख रुपये घेतले. मात्र, काची यांना कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा नफा दिला नाही, असे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर काची यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे तपास करत आहेत. अंजारियाने गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुध्द मुंबईतही एक असाच गुन्हा दाखल आहे.