दहा लाखांचे कर्जही मंजूर करून घेतले
पिंपरी – आयडिया कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सीम कार्ड थ्री जी मधून फोर जी मध्ये कन्व्हर्ट करण्यास सांगून व्यक्तीचे सीमकार्ड बंद केले. त्यानंतर त्या सीम क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या बॅंक खात्यावर दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाची रक्कम आणि बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम असे एकूण 13 लाख 42 हजार 499 रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठवून व्यक्तीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 6 ते 7 मे 2020 या कालावधीत स्पाईन रोड, चिखली प्राधिकरण येथे घडला आहे.
दीपक साहेबराव सूर्यवंशी (वय 47, रा. स्पाईन रोड, चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी 25 जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7904981441 या मोबइल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 6 मे रोजी दुपारी पावणे बारा वाजता फिर्यादी दीपक यांना फोन आला. फोनवरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. “मी आयडिया कंपनी, नोएडा येथून बोलत आहे. तुम्ही वापरत असलेले सीमकार्ड हे थ्री जी आहे. ते फोर जी मध्ये अपडेट करावे लागेल. जर अपडेट केले नाही तर तुमचे सीमकार्ड बंद होईल’ असे फोनवरील व्यक्तीने दीपक यांना सांगितले. त्यानंतर दीपक यांच्याकडून अधिक माहिती घेऊन त्यांच्या मोबइलवर 991210000053037782 हा नंबर पाठवला.
आरोपीने पाठवलेला नंबर दीपक यांना आयडिया कंपनीच्या सर्विस क्रमांक 12345 यावर पाठवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी वरील नंबर सांगून मेसेजद्वारे सीमकार्ड अपडेट करण्यासाठी संमती संमती दिली आणि आरोपीच्या सांगण्यानुसार पुन्हा तो मेसेज कंपनीच्या सर्विस क्रमांकावर पाठवला.
दीपक यांना कंपनीकडून “तुमचे सीमकार्ड 6 मे रोजी डिऍक्टिव्हेट होईल आणि 7 मे रोजी दुपारी तीन वाजता सुरु होईल, असे सांगितले. परंतु 7 मे रोजी सीमकार्ड सुरु झाले नाही. त्यामुळे दीपक यांनी आरोपीच्या मोबइलवर संपर्क केला.
“तुमचेच काम सुरू आहे. एक तासात मोबइल फोन सुरू होईल’ असे सांगितले. दीपक यांचा मोबइल फोन क्रमांक त्यांच्या बॅंक खात्याला कनेक्ट आहे. त्यांना शंका आल्याने त्यांनी बॅंक खाते ऑनलाइन उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे बॅंक खाते उघडले नाही.