पुणे – रायगड तसेच पुरंदर तालुक्यांत जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या संचालकांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी एक्सपॅट प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट कंपनीचे संचालक सच्चिदानंद रामप्पा कांचन, संतोष बाळकृष्ण शेट्टी, नेनमूल भाटिया, लॅसेल व्हिक्टर डिसोजा, संतोष अलेक्झांडर बेंजमिन, वर्लिन डिसोजा, अर्पिल वाघमारे यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
नितेश कांतीलाल ठक्कर (रा. वाकड) यांनी यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एक्सपॅट प्रोजेक्ट कंपनीचे कार्यालय पौंड रस्ता परिसरात आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय बंगळुरूमध्ये आहे. या कंपनीकडून ठक्कर यांना जमीन खरेदीत गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते.
रायगड जिल्ह्यातील कुडळी विले गावात गर्व व्हिलेज, रोहा परिसातील पार्क व्ह्यू आणि पुरंदरमधील पांगारे गावात असलेल्या लावण्या प्रकल्पात बंगल्यासाठी जमिनीची विक्री करण्यात येणार आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास दरमहा व्याज दिले जाईल किंवा त्यापोटी जमीन दिली जाईल, असे आमिष दाखवले होते.
ठक्कर, त्यांची पत्नी आणि नातेवाईकांनी या प्रकल्पात 75 लाख 43 हजार रुपये गुंतवले होते. त्यानंतर कंपनीकडून व्याज देण्यात आले नाही तसेच जमीन देण्यास नकार देण्यात आला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी करत आहेत.