पुणे – जादा व्याजाचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेची 55 लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेमंत भोपे व लता भोपे अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी कोथरुड येथे रहाणाऱ्या फिर्यादी 37 वर्षीय महिला व्यावसायीकास फसवले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा व्यवसाय असून तीने आरोपी हेमंत भोपे याचे गुंतवणुकीसंदर्भातील एक वर्कशॉप अटेंड केले होते.
आरोपींनी त्यांना सन 2017 मध्ये मनी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. त्यांनी 55 लाख रुपये गुंतवल्यानंतर त्यांना यातील काही रकमेवर महिना 2.2 टक्के व्याज व काही रकमेवर वार्षिक 30 टक्के प्रमाणे व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, व्याज देणे बंद केल्याने फिर्यादीने याची वारंवार विचारणा केल्यावर टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपी हेमंत भोपेवर विविध ठिकाणी गुन्हे
आरोपी हेमंत भोपे याच्यावर दिल्ली, कलकत्ता, दत्तवाडी तसेच निगडी आदी ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुंतवणुकीसंदर्भातील प्रा.लि.कंपनी होती. तसेच तो मनी ट्रेडिंग संदर्भातील वर्कशॉपही घेत होता. तो सध्या पूर्वीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.