जातेगाव बुद्रुक येथील घटना
शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याला फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर घेऊन देतो, असे म्हणून तब्बल तीन लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दशरथ इंगवले यांनी (रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली असून दत्तूसिंग राजारामसिंग ठाकूर (रा. किनगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जातेगाव बुद्रुक येथील दशरथ इंगवले यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा होता. त्याची ओळख दत्तूसिंग ठाकूर याच्यासोबत झाली. त्यावेळी त्याने कात्रज येथील फायनान्सच्या लिलावात ट्रॅक्टर आलेले असून त्यामधील ट्रॅक्टर तुम्हाला घेऊन देतो, असे म्हणून दि. 21 जून रोजी वीस हजार रुपये घेतले.
त्यानंतर ट्रॅक्टरची उरलेली रक्कम तीन लाख एकसष्ट हजार रुपये इंगवले यांच्या बॅंक खात्यातून आरटीजीएसद्वारे घेतली. त्यांनतर इंगवले यांना ठाकूर याने ट्रॅक्टर दिला नाही. त्यामुळे इंगवले यांनी ठाकूर याच्याकडे मला ट्रॅक्टर दे अथवा माझे घेतलेले पैसे दे अशी विनंती केली. तरी ठाकूर याने इंगवले यांना ट्रॅक्टर न देता त्यांचे पैसे देखील परत दिले नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.