मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तीचा पती राज कुंद्रा यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बराई यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपींची चौकशी करू शकतात. तसेच या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पाशी पोलीस संपर्क साधण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये देखील कुंद्रा दाम्पत्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बराई यांनी शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 2014 पासून फसवणूक करत असल्याची तक्रार दिली आहे. बराई यांच्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात सहा वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
बराई यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, शिल्पा आणि राज यांच्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम उघडली तर खूप फायदा होईल. त्यांच्यावर विश्वास ठेवून बराई यांनी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांच्या पैशांचा वापर आपल्या फायद्यासाठी केला. तसेच त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा धमकी देखील देण्यात आली.
दरम्यान, राज कुंद्रा याला जुलैमध्ये पॉर्न फिल्म प्रकरणी अटक करण्यात आली होती. पाॅर्न फिल्म बनविल्याच्या आरोपाखाली कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.